शुक्रवारी होणार बकरी ईदचे सामूहिक नमाजपठण
By Admin | Updated: September 23, 2015 00:33 IST2015-09-23T00:33:29+5:302015-09-23T00:33:38+5:30
तयारी पूर्णत्वास : ईदगाह मैदान सोहळ्यासाठी सज्ज; बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी गर्दी

शुक्रवारी होणार बकरी ईदचे सामूहिक नमाजपठण
नाशिक : मराठी दिनदर्शिकेमध्ये येत्या २४ तारखेला गुरुवारी बकरी ईदचा सण दर्शविण्यात आला आहे; मात्र गेल्या १४ तारखेला सोमवारी शहरात चंद्रदर्शन घडले नाही तसेच अन्य शहरांमधून चंद्रदर्शन झाल्याची ग्वाहीदेखील विभागीय चांद समितीकडे प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे बकरी ईदचा सण हा शुक्रवारी (दि. २५) साजरा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ईदगाह मैदानावर सकाळी सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार असल्याने जय्यत तयारीला वेग आला आहे.
इस्लामी कालगणनेतील अकरावा महिना ‘जिलकद’च्या २९ तारखेला सायंकाळी चंद्रदर्शनाची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन घडले नाही. बकरी ईदचा सण एक दिवस पुढे ढकलला गेला व गुरूवार ऐवजी शुक्रवारी बकरी ईद (ईद-उल-अज्हा)चे नमाजपठण करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला, असे सिरत व चांद समितीचे प्रवक्ते मीर मुख्तार अशरफी यांनी सांगितले.
शहाजहांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करण्यात येणार आहे. शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ‘ईद-उल-अज्हा’ची विशेष नमाज अदा केली जाणार आहे. समाजबांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे व पारंपरिक पद्धतीने शांततेत बकरी ईदचा सण साजरा करावा, असे आवाहन खतीब-ए-शहर यांनी केले आहे. दरम्यान ईदच्या कपडे खरेदीसाठी बााजरपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. भद्रकाली येथील शिवाजी कापड बाजार, मेन रोड परिसरात खरेदीची लगबग रात्री उशिरापर्यंत दिसत होती. (प्रतिनिधी)