सीसीटीव्हीच्या आधारे घंटागाड्यांची देयके
By Admin | Updated: December 24, 2016 01:22 IST2016-12-24T01:22:19+5:302016-12-24T01:22:40+5:30
महापालिका : आयुक्तांनी दिले निर्देश

सीसीटीव्हीच्या आधारे घंटागाड्यांची देयके
नाशिक : महापालिका आयुक्तांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारूनही अजूनही घंटागाडी ठेकेदारांकडून पूर्ण क्षमतेने नवीन गाड्या रस्त्यावर आणल्या जात नसल्याचे चित्र आहे. खतप्रकल्पावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे शुक्रवारी (दि.२३) १२६ घंटागाड्या आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी जोपर्यंत जीपीएस यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यक्षम होत नाही तोपर्यंत सीसीटीव्हीच्या आधारे ठेकेदारांना देयके अदा करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.
घंटागाड्यांचा ठेका देऊन दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी ठेकेदारांकडून अद्यापही पूर्ण क्षमतेने नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणल्या जात नसल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याबाबत ठेकेदारांना प्रतिदिन प्रतिवाहन दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. ठेकेदारांनी २० डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सर्व नवीन घंटागाड्या जीपीएस प्रणालीसह रस्त्यावर आणण्याचे आश्वासन दिले होते, ठेकेदारांकडून त्याचे पालन झालेले नाही.