फुले आर्थिक महामंडळाच्या व्यवस्थापकास घेराव

By Admin | Updated: March 19, 2017 00:12 IST2017-03-19T00:11:55+5:302017-03-19T00:12:10+5:30

नाशिक : महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज प्रकरणांचे अर्ज मंजूर करण्यावरून अर्जदारांनी व्यवस्थापक रोकडे यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली.

Ground the manager of Flowers Financial Corporation | फुले आर्थिक महामंडळाच्या व्यवस्थापकास घेराव

फुले आर्थिक महामंडळाच्या व्यवस्थापकास घेराव

 नाशिक : महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडून बेरोजगारांच्या कर्ज प्रकरणांचे अर्ज मंजूर करण्यावरून शनिवारी शेकडो अर्जदारांनी महामंडळाचे व्यवस्थापक रोकडे यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. सकाळी नऊ वाजेपासून बैठकीला येऊनही पदरी निराशा पडलेल्या अर्जदारांनी थेट जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वातावरण तप्त झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णा भाऊ साठे, ओबीसी, वसंतराव नाईक व संत रोहिदास महामंडळ या पाचही महामंडळांकडून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या बेरोजगारांचा मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी बोलविण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या उपस्थितीत व कर्ज प्रकरणे करणाऱ्यांसमक्ष प्रकरणे मंजूर करण्यात येत असताना अन्य महामंडळांच्या प्रकरणांचा निपटारा झाला. तथापि, फुले आर्थिक विकास महामंडळाकडून सादर करण्यात आलेली १७० प्रकरणे पूर्णत: अपूर्ण होते. अनेक प्रकरणांवर अर्जदारांच्या स्वाक्षऱ्याच नसल्याची बाब प्रकरणांच्या छाननीत निदर्शनास आल्याने बगाटे यांनी व्यवस्थापक रोकडे यांना धारेवर धरले व सर्व प्रकरणे पूर्ण असल्याशिवाय मंजुरीसाठी न ठेवण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, सकाळी नऊ वाजेपासून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अर्जदारांना सायंकाळी साडेचार वाजल्यानंतरही रिकाम्या हाताने माघारी परतण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करीत रोकडे यांना घेराव घातला व जाणूनबुजून प्रकरणे अपूर्ण ठेवल्याचा आरोप केला. सात ते आठ महिन्यांपासून प्रकरणे सादर करूनही ते अपूर्ण कसे राहिले असा सवाल करीत, जानेवारी महिन्यातही अपूर्ण प्रकरणांमुळे मंजुरी मिळू शकली नाही.
आता मार्च अखेर असून, बॅँका कर्जपुरवठा करण्यास तयार असताना निव्वळ व्यवस्थापकाच्या चुकीमुळे कर्जापासून वंचित राहावे लागत असल्याचे अर्जदारांचे म्हणणे होते. कर्जाचे अर्ज परिपूर्ण करून घेण्याची जबाबदारी व्यवस्थापकांची असूनही त्यांनी हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत शेकडो अर्जदारांनी थेट अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या कार्यालयाला धडक दिली. ते नियोजन हॉलमध्ये बैठकीत व्यस्त असल्याचे पाहून अर्जदारांचा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे वळाला. अर्जदारांचा संताप पाहता, जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना त्यांचे म्हणणे जाणून घेण्याच्या सूचना दिल्या. अर्जदारांनी त्यांनाही भंडावून सोडले. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारवाडा पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
अर्जदारांचा आक्रमक पवित्रा पाहता अखेर अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी समोर येत त्यांना आश्वस्त केले. बैठकीसाठी जे हजर होते अशा सर्व अर्जदारांचे कर्ज प्रकरणांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व येत्या आठवडाभरात ते निकाली काढले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. जे अर्जदार आले त्यांची यादी करण्याच्या सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Ground the manager of Flowers Financial Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.