चौकशीसाठी अभियंत्याला ग्रामस्थांचा घेराव
By Admin | Updated: July 13, 2015 23:19 IST2015-07-13T23:18:57+5:302015-07-13T23:19:30+5:30
जायखेडा-नामपूर रस्ता : ठेकेदाराकडून नामंजूर खडीचा वापर

चौकशीसाठी अभियंत्याला ग्रामस्थांचा घेराव
सटाणा : तालुक्यातील जायखेडा ते नामपूर या रस्त्याच्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामासाठी वापरली जाणारी निकृष्ट दर्जाची खडी बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने नामंजूर करूनही ठेकेदाराने एका शाखा अभियंत्याला हाताशी धरून ती निकृष्ट खडी कामात वापरल्याचा प्रकार आसखेडा येथील सरपंचाने उघडकीस आणला आहे. तो ठेकेदार बांधकाम विभागातीलच एका अभियंत्याचा पुत्र असून, या जोरावर निकृष्ट दर्जाचे रस्ता काम करणाऱ्या या ठेकेदाराची चौकशी करावी आणि या राज्य मार्गाचे काम नव्याने करण्यात यावे, या मागणीसाठी मालेगाव येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला घेराव घालण्यात आला.
औरंगाबाद-अहवा राज्य मार्गावरील जायखेडा ते नामपूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम केंद्राच्या राखीव निधीमधून मंजूर करण्यात आले आहे. हे काम बांधकाम विभागातीलच एका अभियंत्याच्या पुत्राने घेतले आहे. मात्र या कामासाठी सर्रास निकृष्ट दर्जाची खडी आणून टाकली होती. हा प्रकार जायखेडा, ब्राह्मणपाडे, आसखेडा, द्याने, नामपूर येथील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देत कामाबाबत तक्र ार केली होती. याची दखल घेत गुणवत्ता नियंत्रण विभागाने ही निकृष्ट दर्जाची खडी नामंजूर करून काम बंद पाडले होते. असे असतानाही या ठेकेदाराने आठच दिवसांत एका शाखा अभियंत्याला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आणून गुणवत्ता नियंत्रण विभागाने नामंजूर खडी राजरोस कामात वापरली. या प्रकाराबाबत आसखेड्याचे सरपंच साहेबराव कापडणीस यांच्यासह ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला; मात्र या ठेकेदाराने कोणालाही न जुमानता काम पूर्ण करण्याचा प्रयत्न
केला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या कामाची चौकशी करून नव्याने हे काम करावे, या मागणीसाठी आसखेड्याचे सरपंच साहेबराव कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता झांबरे यांना घेराव घालण्यात आला. दरम्यान, कार्यकारी अभियंता झांबरे यांनी कामाची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर निवेदन सादर करून घेराव मागे घेण्यात आला. याप्रसंगी सरपंच कापडणीस, संदीप बिरारी, अमृत कापडणीस, प्रकाश कापडणीस, भूषण बिरारी, अनिल कापडणीस, योगेश कापडणीस, तुषार कापडणीस, संजय सावळा, विशाल सोनवणे, दिनेश कापडणीस आदि सहभागी होते. (वार्ताहर)