गुणवंत अंध महिलांचा सत्कार
By Admin | Updated: March 16, 2015 01:11 IST2015-03-16T01:11:05+5:302015-03-16T01:11:22+5:30
अपंग सहाय्यता दिन : सात महिलांचा गौरव

गुणवंत अंध महिलांचा सत्कार
नाशिक : जागतिक अपंग सहाय्यता दिनानिमित्ताने दि ब्लाइन्ड वेल्फेअर आॅर्गनायझेशनच्या वतीने गुणवंत अंध महिलांचा गौरव करण्यात आला. पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केटीएचएम महाविद्यालयाच्या सुनंदा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कल्पना खराडे यांनी ‘अंधांच्या जीवनातील शिक्षणाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपल्यातील गुण ओळखले, तर आपण कोणत्याही क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करू शकतो. यासाठी आपण आपणाला समाजाच्या मूळ प्रवाहाच्या जवळच ठेवले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. व्हाईस व्हिजनच्या संचालक सुश्मिता बुबना यांनीही मनोगत व्यक्त केले. कठीण परिस्थितीवर मात करून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे यात स्त्री नेहमीच श्रेष्ठ ठरली आहे. हे श्रेष्ठत्व स्त्रीने जपले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कल्पना खराडे यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निकिता वेद, सुश्मिता बुबना, मीरा आव्हाड या अंधांचा, तर साधना वझे, मीना पाटील, सुनंदा गिते या डोळसांचा गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन दत्ता पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजया मराठे यांनी करून दिला. संस्थेचा परिचय अरुण भारस्कर यांनी करून दिला. मानद अध्यक्ष कल्पना पांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)