म्हसुर्लीला माळीणची पुनरावृत्ती टळली
By Admin | Updated: August 8, 2014 00:59 IST2014-08-05T21:25:14+5:302014-08-08T00:59:31+5:30
म्हसुर्लीला माळीणची पुनरावृत्ती टळली

म्हसुर्लीला माळीणची पुनरावृत्ती टळली
घोटी : इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली गावाजवळ असणाऱ्या वंगणवाडी परिसरातील डोंगरात दुध डेअरीसाठी खोदण्यात आलेल्या अनधिकृत तलावाच्या बांधाला मुसळधार पावसामुळे तडे गेल्याने तलावाचा बांध व भराव वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. तलाव फुटल्यास पायथ्याशी असलेली वंगणवाडी वस्ती वाहून जाण्याच्या शक्यतेने येथील आठ कुटूंबांना पोलिसांच्या सतर्कतेने स्थलांतरीत करण्यात आल्याने माळीणची पुनरावृत्ती टळली आहे.
इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली गावालगत असलेल्या डोंगरावर नाशिकच्या बापू देवरे नामक व्यक्तीने दुध डेअरी व्यवसाय सुरु केला आहे. व्यवसायासाठी त्यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता वनविभागाच्या जमिनीलगत पाण्याचा साठा करण्यासाठी तलाव बांधलेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तलावाखालील वंगणवाडी वस्तीच्या सुरिक्षततेचा विचार न करता उपाययोजना न केल्याने यावर्षीच्या मुसळधार पावसामुळे तलावालगतचा डोंगर खचला आहे. डोंगराचा मलबा तलावाच्या पाण्यात आल्याने बंधाऱ्याला तडे गेले. यामुळे तलाव कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता होती. तलाव फुटल्यानंतर खालील वंगणवाडी वस्तीला हानी पोहचत वाडी वाहून जाण्याच्या भीतीने पोलीस पाटील शांताराम तांबे यांनी समय सुचकता दाखवत घोटी पोलिसांना या बाबतची कल्पना देत येथील कुटुंबे तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी केली.
घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह कर्मचारी शांताराम निंबेकर, सुभाष निकम आदींनी मध्यरात्री वस्तीत जावून सर्व कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.