सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
By Admin | Updated: November 2, 2015 22:38 IST2015-11-02T22:35:32+5:302015-11-02T22:38:28+5:30
विविध कार्यक्रम : प्रतिमापूजन, मिरवणुका आणि शपथ ग्रहण कार्यक्रम

सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
नाशिक : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था यांच्यातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने प्रतिमापूजनासह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सिडको येथील सरदार वल्लभभाई पटेल ग्रुपच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सिडकोतील सरदार वल्लभभाई पटेल ग्रुपच्या वतीने दरवर्षी पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्या हस्ते पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानिमित्त त्रिमूर्ती चौक येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मिरवणूक त्रिमूर्ती चौक, सावतानगर, पवननगर, उत्तमनगरमार्गे भोळे मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रमोद पाटील, बारसू कोल्हे, नारखेडे, सुभाष चिरमाडे, राहुल भिरुड, पुरषोत्तम महाजन, प्रीतम कोलते, दीपक इंगळे, किरण चौधरी, रोहिदास चौधरी आदि सहभागी झाले होते. आभार सतीश पाटील यांनी मानले.
नेहरू युवा केंद्र
युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र संलग्न शक्ती विकास अकॅडमी या बहुद्देशीय संस्थेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक किसन सांगळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर जगताप, मनीषा जगताप, देवीदास गांगुर्डे, दीपक जगदाळे, संतोष देशमाने, अशोक जगताप आदि उपस्थित होते. किसन सांगळे यांनी सरदार पटेल यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली.
विभागीय आयुक्त कार्यालय
विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. याप्रसंगी उपआयुक्त नेमाणे, सहायक आयुक्त सांगळे, वाघमारे, तहसीलदार मंजूषा घाटगे आदि उपस्थित होते.
कॉँग्रेस कार्यालय
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी कॉँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. इंदिरा गांधी यांनी जगात शांतता निर्माण व्हावी, यासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतल्याचे अॅड. आकाश छाजेड यांनी सांगितले. किरण जाधव, अभिजीत राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी नगरसेवक समिना मेमन, राहुल दिवे, रामप्रसाद कातकाडे, बापू विस्ताने, दिनकर चकणे आदि उपस्थित होते.
महापालिकेतर्फे अभिवादन
महापालिकेतर्फे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय संकल्पदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, जीवन सोनवणे, संजय चव्हाण, विजय पगार, हरिभाऊ फडोळ, आर. एस. बहीरम, आर. के. पवार, यू. बी. पवार, एस. एम. चव्हाणके आदि उपस्थित होते.