तबला महोत्सवातून पलुस्कर यांना अभिवादन
By Admin | Updated: February 26, 2017 23:11 IST2017-02-26T23:10:45+5:302017-02-26T23:11:09+5:30
पंडित जयंत नाईक यांच्या गुरूकृपा तबला अकादमी आणि नाशिक : रामनाम आधाराश्रामातर्फे आयोजित तबला महोत्सव रविवारी (दि. २६) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

तबला महोत्सवातून पलुस्कर यांना अभिवादन
नाशिक : पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पंडित जयंत नाईक यांच्या गुरूकृपा तबला अकादमी आणि रामनाम आधाराश्रामातर्फे आयोजित तबला महोत्सव रविवारी (दि. २६) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पंचवटीतील श्रीराम नाम आधार आश्रम येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तबला महोत्सवाची सुरुवात विजय खिस्ती यांच्या झपतालाने झाली. यानंतर पंडित जयंत नाईक यांच्या विद्यार्थ्यांनी तीन ताल पेश करत उपस्थितांनी मने जिंकली. तबला महोत्सव उत्तरोत्तर रंगत असताना प्रमोद भडकमकर आणि वैष्णवी भडकमकर यांनी सहवादन करताना तीन ताल, पुरब घराण्याचे कायदे, तराणे आणि बंदिशीचे सादरीकरण करत कार्यक्र मात विशेष रंगत आणली. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात असे अखंड बारा तास तबलावादन यावेळी करण्यात आले. या तबला महोत्सवात रसिक कुलकर्णी, जयंत नाईक आणि त्यांचे शिष्य तसेच गांधर्व महाविद्यालयातर्फे तीन तालांचे सादरीकरण करण्यात आले. तबला महोत्सवाची सुरुवात कल्याणी दसककर, गौरी दसककर, ईश्वरी दसककर आणि ज्ञानेश्वर कासार यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची प्रार्थना करून झाली. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात नितीन पवार तबला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी तीन ताल सादर केले, तर सुजित काळे यांनी ताल रूपक सादर केले. कार्यक्रमाची सांगता जयंत नाईक यांच्या झपताल सादरीकरणाने झाली. यामध्ये ड्रम, पखवाज आणि तबला वादन याची अनोखी जुगलबंदी श्रोत्यांना अनुभवायला मिळाली. तबला महोत्सवाअंतर्गत पुष्कराज भागवत, ज्ञानेश्वर कासार यांनी सहगायन केले, तर संवादिनीवर सुभाष दसककर, सागर कुलकर्णी, दिव्या रानडे यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)