हरित न्यायाधिकरणाकडे दाद
By Admin | Updated: October 3, 2014 01:31 IST2014-10-03T01:26:51+5:302014-10-03T01:31:37+5:30
हरित न्यायाधिकरणाकडे दाद

हरित न्यायाधिकरणाकडे दाद
नाशिक : शहरातील पर्यावरणप्रेमींनी एकही झाड तोडण्यास केलेला विरोध आणि त्याचबरोबर न्यायालयाने एकही झाड तोडण्यापूर्वी परवानगी घेण्याची अट या पार्श्वभूमीवरही महापालिकेने २०१४ झाडे तोडण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी पर्यावरणप्रेमींच्या हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेने इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याची तयारी केली असली, तरी त्यापैकी अवघे ३८६ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.गेल्या एक ते दीड वर्षापासून पालिकेकडून सातत्याने वृक्षतोडीचे प्रस्ताव सादर केले जात आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालय आणि पुण्याच्या हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली आहे. यापूर्वी दाखल केलेल्या एका याचिकेदरम्यान उच्च न्यायालयाने झाडे तोडण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी अशी अट घातली असून, अशा प्रस्तावांच्या छाननीसाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यास सांगितले आहे; परंतु त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. मात्र पालिकेने २०१४ झाडे तोडण्यासाठी हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहराच्या विविध भागांतील झाडे तोडण्यासंदर्भात हरकती किंवा सूचना असतील तर १३ आॅक्टोबरपर्यंत त्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जुना आग्रारोड, आदिवासी विकास भवनसमोर येथे सादर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. एकीकडे पालिका ग्रीन कुंभ साजरा करण्यासाठी आवाहन करीत आहे, त्याचप्रमाणे नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन शाळाशाळांमधून केले जात आहे आणि दुसरीकडे मात्र झाडांवर कुऱ्हाड चालविण्याची तयारी असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.