हरित लवाद याचिका; बोलविता धनी वेगळाच
By Admin | Updated: March 16, 2016 23:19 IST2016-03-16T23:17:27+5:302016-03-16T23:19:27+5:30
उलटसुलट चर्चा : मनपा करणार पुनर्विलोकन याचिका

हरित लवाद याचिका; बोलविता धनी वेगळाच
नाशिक : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील नव्या बांधकामांना गेल्या चार महिन्यांपासून मनाई असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला, परंतु खतप्रकल्पाचा आधार घेऊन लवादाकडे केलेल्या याचिकेचा बोलविता धनी वेगळाच असल्याची उलटसुलट चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. दरम्यान, हरित लवादाकडे बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर लवादाने संकीर्ण अर्जाऐवजी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचे निर्देश महापालिकेला दिले असल्याचे समजते. पुढील सुनावणी आता २१ मार्च रोजी होणार आहे.
पाथर्डी शिवारात महापालिकेचा कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प आहे, परंतु त्यामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचे नागरिक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. काहींनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे. महापालिकेला वेळोवेळी खतप्रकल्प योग्य पद्धतीने चालविण्यासाठी निर्देश देऊनही त्याचा उपयोग होत असून, पालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने ९ नोव्हेंबर २०१५ रोजी हरित न्यायाधिकरणाने महापालिका हद्दीत नवीन बांधकामांना मनाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून नवीन बांधकाम प्रस्ताव दाखल करून घेतले जात नसल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे.
शहराच्या विकासावरच गदा आल्याने महापालिकेने राष्ट्रीय हरित लवादाकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन महापालिकेने काही अटी-शर्तींवर बांधकामांना परवानग्या देण्याची विनंती केली होती. परंतु मुंबईतील बांधकामांनाही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाकडे बोट दाखवत हरित लवादाने पुढील सुनावणी दि. १६ मार्चला निश्चित केली होती. त्यानुसार, बुधवारी सुनावणी होऊन लवादाने संकीर्ण अर्जाऐवजी पुनविर्लोकन याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याचे समजते. आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनीही त्यास दुजोरा दिला असून येत्या तीन-चार दिवसात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, हरित लवादाकडे काही शेतकरी व नागरिकांनी केलेल्या याचिकेमागचा बोलविता धनी कोणी वेगळाच असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. विशेषत: उद्योग क्षेत्रातील नामवंताचे नाव पुढे येत असून मोठ्या प्रमाणावर निधीही पुरविला जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. परंतु, अधिकृतपणे कोणीही नाव घ्यायला तयार नाही. (प्रतिनिधी)