‘गढीवरच्या पोरीं’ना दाद!

By Admin | Updated: October 25, 2015 23:29 IST2015-10-25T23:28:56+5:302015-10-25T23:29:55+5:30

‘गढीवरच्या पोरीं’ना दाद!

'Grasshopper Potters'! | ‘गढीवरच्या पोरीं’ना दाद!

‘गढीवरच्या पोरीं’ना दाद!

नाशिक : पाच तरुणी... प्रत्येकीच्या आत खोलवर दडलेले एकाकीपणाचे भयाण आभाळ.... त्या आभाळाच्या पाटीवर रेघोट्या ओढाव्यात तशा त्या पाचही जणी व्यक्त होत राहतात अन् त्यातून त्या शांतपणे निघतात उजेडाच्या दिशेने... या आगळ्या अनुभूतीला रसिकांकडूनही मग टाळ्यांची दाद मिळत राहते...
दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘गढीवरच्या पोरी’ नाटकाचा प्रयोग परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आज सायंकाळी रंगला. मयूरी मंडलिक, मोहिनी पोतदार, नूपुर सावजी, दीप्ती चंद्रात्रे व श्रद्धा देशपांडे यांनी भूमिका साकारल्या. गढी म्हणजे परंपरेचा बंदिस्त बुरुज. या प्रतीकात्मक गढीच्या आतून आपापल्या विश्वाशी संवाद साधणाऱ्या पाच तरुणींची ही कथा आहे. त्या-त्या तरुणीच्या संवादातून तिचे विश्व उलगडत जाते. गर्भश्रीमंत राजकारण्याची मुलगी असलेली, पण लग्नाचा निर्णय लादली जाणारी स्नेहा, शिक्षणासाठी खेड्यातून मुंबईत आलेली, आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी मंगला, एकतर्फी प्रियकराला प्रॅक्टिकल जगणे समजावून सांगू पाहणारी रागिणी, प्रेमभंग विसरू न शकणारी सारिका आणि पीएच.डी.चे गाइड असलेल्या सरांशी निर्माण झालेल्या हळूवार नात्याचा अर्थ शोधू पाहणारी प्रज्ञा अशा पाच पात्रांनी हा दीर्घांक बांधला आहे.
दरम्यान, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात अभिनेते किशोर कदम, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे उपस्थित होते.

Web Title: 'Grasshopper Potters'!