‘गढीवरच्या पोरी’ रंगल्या
By Admin | Updated: November 1, 2015 21:54 IST2015-11-01T21:45:03+5:302015-11-01T21:54:08+5:30
‘गढीवरच्या पोरी’ रंगल्या

‘गढीवरच्या पोरी’ रंगल्या
नाशिक : पाच तरुणींच्या आत खोलवर दडलेले एकाकीपणाचे भयाण आभाळ... एकापाठोपाठ एक अशा या पाचही तरुणी व्यक्त होत राहतात अन् त्यानंतर त्या शांतपणे निघतात उजेडाच्या दिशेने... या आगळ्या अनुभूतीला रसिकांकडूनही मग टाळ्यांची दाद मिळत राहते...
दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘गढीवरच्या पोरी’ नाटकाचा दुसरा प्रयोग कुसुमाग्रज स्मारकात आज सायंकाळी रंगला. मयूरी मंडलिक, मोहिनी पोतदार, नूपुर सावजी, दीप्ती चंद्रात्रे व श्रद्धा देशपांडे यांनी भूमिका साकारल्या. गढी म्हणजे परंपरेचा बंदिस्त बुरुज. या प्रतीकात्मक गढीच्या आतून आपापल्या विश्वाशी संवाद साधणाऱ्या पाच तरुणींची ही कथा आहे. गर्भश्रीमंत राजकारण्याची मुलगी असलेली, पण लग्नाचा निर्णय लादली जाणारी स्नेहा, शिक्षणासाठी खेड्यातून मुंबईत आलेली, आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी मंगला, एकतर्फी प्रियकराला प्रॅक्टिकल जगणे समजावून सांगू पाहणारी रागिणी, प्रेमभंग विसरू न शकणारी सारिका आणि पीएच.डी.चे गाइड असलेल्या सरांशी निर्माण झालेल्या हळुवार नात्याचा अर्थ शोधू पाहणारी प्रज्ञा अशा पाच पात्रांनी हा दीर्घांक बांधला आहे.