महापालिकेच्या हाती सप्टेंबरचेही अनुदान
By Admin | Updated: August 23, 2015 23:48 IST2015-08-23T23:48:06+5:302015-08-23T23:48:38+5:30
तत्पर सरकार : एलबीटीपोटी ४५.८५ कोटी वितरित

महापालिकेच्या हाती सप्टेंबरचेही अनुदान
नाशिक : एरव्ही सरकारकडून अनुदान मिळविण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या महापालिकेला एकापाठोपाठ एक सुखद धक्के मिळत असून, एलबीटीच्या मोबदल्यात आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर महिन्याचेही अनुदान हाती पडणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नाशिक महापालिकेला सप्टेंबर महिन्याचे ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्याचे आदेश काढले आहेत. १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार धरून महापालिकेला एकाच महिन्यात सरकारकडून सुमारे १०५ कोटी रुपयांचे दान मिळाल्याने प्रशासन सुखावले आहे.
राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकांचे उत्पन्न घटणार असल्याने सदर तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचे घोषित केले आहे. सरकारने १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा करण्यापूर्वीच महापालिकांना सहायक अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे २०९८ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. एलबीटी रद्द झाल्यानंतर राज्य सरकारकडून अनुदान वेळेत उपलब्ध होते किंवा नाही, याबाबत संभ्रमावस्था असतानाच सरकारने ४ आॅगस्टलाच नाशिकसह राज्यातील २५ महापालिकांना आॅगस्ट महिन्याचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक महापालिकेला ४५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभीच अनुदान हाती पडल्याने महापालिकेला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर राज्य सरकारने १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची एप्रिल ते जून या कालावधीतील १३ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कमही नाशिक मनपाला वितरित करण्याचे आदेश काढल्याने मनपाला एक सुखद धक्का बसला.