राज्यामध्ये महाआघाडी साथ-साथ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:26+5:302021-08-15T04:17:26+5:30
नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटले असून, राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या जिल्हा ...

राज्यामध्ये महाआघाडी साथ-साथ;
नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटले असून, राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी तिघांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, तर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मात्र भाजपने बहुमताच्या बळावर पुन्हा सत्ता आपल्याकडे ठेवली आहे.
येत्या सहा महिन्यांत पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढेल की परस्पर विरुद्ध लढत होईल याविषयी अटकळी बांधल्या जात आहेत. दुसरीकडे भाजप विरोधात सर्वपक्षीय एकत्र येण्याची भाषाही केली जात आहे.
-------------
पंचायत समिती
जिल्ह्यात पंधरा पंचायत समित्या असून, सद्य:स्थितीत या पंचायत समित्यांवर शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. काँग्रेस मात्र तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी व सेनेच्या मदतीने उपसभापतिपदावरच समाधान मानून आहे, तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे ग्रामीण भागात वर्चस्व नाही.
-------------
जिल्हा परिषद
नाशिक जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी एकत्र असून, अध्यक्षपद सेनेकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. काँग्रेसकडे एक सभापतिपद देण्यात आले असून, अन्य दोन सभापतिपद राष्ट्रवादी, सेनेने वाटून घेतली आहेत. भाजपला मात्र सत्तेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
---------
नाशिक महापालिका
नाशिक महापालिकेत गेल्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने गेल्या साडेचार वर्षांपासून भाजपचाच महापौर असून, स्थायी समिती व उपमहापौरपदही भाजपकडे आहे. महाविकास आघाडीतील पक्ष सत्तेबाहेर आहेत. काही प्रभाग समित्या सेनेकडे आहेत.
------------------
तीन पक्ष, तीन विचार
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीला बरोबर घेऊन लढण्याचा विचार बोलून दाखविला होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. नंतर मात्र स्वबळाची चाचपणी सुरू केली.
-------
राष्ट्रवादी काँग्रेसनेही महाविकास आघाडीसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवेल असे जाहीर केले होते. काँग्रेसने स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केल्यावर राष्ट्रवादीने त्यावर टीका केली होती. आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढेल असे जाहीर केले.
----------
काँग्रेसने पहिल्यापासूनच स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा सुरू केली होती. त्यावरून महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला होता. काँग्रेसच्या या निर्णयावर राष्ट्रवादी, सेनेने टीकाही केली होती. नंतर मात्र काँग्रेसच्या निर्णयावर प्रत्येकाला पक्ष वाढविण्याची मुभा असल्याचे सांगून सारवासारव करण्यात आली.
-----------
पक्षांचे जिल्हा प्रमुख म्हणतात...
शिवसेनेची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पक्ष सांगेल तर स्वबळावर लढविली जाईल. याबाबत पक्ष प्रमुखांचा निर्णय अंतिम असेल. मात्र, भाजपला सत्तेवर येऊ दिले जाणार नाही.
- विजय करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख
------
राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी एकत्र आली तर एकत्र लढू, अन्यथा पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही ठेवली आहे.
- रवींद्र पगार, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष
-----
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पहिल्यापासूनच स्वबळावर लढण्याची तयारी आहे. तशी पक्ष कार्यकर्त्यांची भावनाही आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अगोदर स्वबळावर प्रयत्न होईल. जेथे गरज असेल, तेथे आघाडीचा विचार करता येईल.
- डॉ. तुषार शेवाळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष