ग्रामीण भाजपातही नाराजी

By Admin | Updated: February 4, 2017 23:54 IST2017-02-04T23:54:10+5:302017-02-04T23:54:28+5:30

घराणेशाही, नातेगोते : ‘मिशन-४१ प्लस’ अडचणीत

Grameen BJP | ग्रामीण भाजपातही नाराजी

ग्रामीण भाजपातही नाराजी

नाशिक : महापालिका निवडणुकीत शहर भाजपामध्ये उफाळून आलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भाजपातही सारे काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. नाती-गोती व घराणेशाहीमुळे भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. भाजपाच्या खासदारांच्या घरात दोन उमेदवारी, विद्यमान सभापतींच्या घरात एक उमेदवारी, ज्येष्ठ नेत्यांच्या नात्यागोत्यात उमेदवारी जाण्याची चिन्हे असल्याने काही गटांमधून भाजपाला बंडाळीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या घरातच पक्षाची दोन तिकिटे जाण्याची चर्चा असून, त्यात खासदारपुत्र समीर चव्हाण कनाशी गटातून, तर खासदारांच्या पत्नी विद्यमान सदस्य कलावती चव्हाण यांना सुरगाणा तालुक्यातील हट्टी गटातून उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचप्रमाणे निफाड तालुक्यातील उगाव गटातून भाजपाच्याच एका ज्येष्ठ नेत्याच्या नातलगाला उमेदवारी मिळणार असल्याचे गृहीत धरून भाजपाकडून इच्छुक असलेल्या बबन सानप यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी चालविली आहे. भाजपाचे विद्यमान सभापती केदा अहेर यांच्या पत्नी देवळ्याच्या माजी नगराध्यक्ष धनश्री केदा अहेर यांची लोहणेर गटातून उमेदवारी करण्याची तयारी आहे. मालेगावमधून भाजपा लोकप्रतिनिधींच्या घरातून एका गटात उमेदवारी केली जाण्याची शक्यता आहे.  सिन्नर तालुक्यातूनही भाजपाच्या माजी आमदार कन्येने उमेदवारी फॉर्म भरल्याची चर्चा आहे. शहरी भागात उमेदवारी देण्यासाठी दोन लाखांच्या कथित व्हिडीओवरून आधीच अडचणीत सापडलेल्या भारतीय जनता पक्षासाठी ग्रामीण भागातही अनेक अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Grameen BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.