ब्राह्मणगाव : येथील ग्रामपालिकेच्या ग्रामसभेत शौचालय अनुदानावरुन वादळी चर्चा झाली. शौचालयांचे अनुदान वितरित करताना प्रत्यक्ष कामांची पाहणी झाली नसल्याचा आरोप करतानाच या प्रकरणी गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी काही युवकांनी ग्रामपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकले होते. मात्र, पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर कुलूप काढण्यात आले.येथील बाजार चौकात महादेव मंदिर ओट्यावर सरपंच सरला अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. ग्रामसभेत सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या कालावधीत झालेल्या शौचालय बांधकाम व अनुदान वाटप या विषयावर वादळी चर्चा करत ग्रामस्थांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. गावात चार-पाच दिवसांपासून शौचालय अनुदान व बधकामाचा विषय धुमसत होता. त्यासाठी ग्रामसभेला युवकांची गर्दी लक्षणीय होती. शौचालयाचे झालेल्या निकृष्ट दर्जाचे काम व लाभार्थीच्या कामाच्या चौकशीचे निवेदन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी सरपंच सरला अहिरे व ग्रामविकास अधिकारी एन.एन.सोनवणे यांना दिले होते. त्यानुसार, ग्रामसभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. गावात ३०९ शौचालय मंजूर झाले असून याकामी तीन ठेकेदार नेमण्यात आले होते. त्यातील ६५ शौचालयांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शौचालयांचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असताना देखील प्रत्येकी बारा हजार रु पये अनुदान लाटले गेल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, काही युवकानी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेऊन प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. सखोल चौकशीचे आश्वासन दिल्याशिवाय कुलुप उघडनार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. मात्र लखमापुर दूरक्षेत्रचे पोलिस कर्मचारी हेमंत कदम यांनी समजूत काढल्यानंतर कुलूप उघडण्यात आले. ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी एन.एन.सोनवणे यांनी मागील इतिवृत्त व गावातील झालेल्या कामाचा आढावा घेतला.
शौचालय अनुदानावरुन ब्राह्मणगावची ग्रामसभा गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 18:07 IST
ग्रामपंचायत प्रवेशद्वाराला ठोकले कुलूप
शौचालय अनुदानावरुन ब्राह्मणगावची ग्रामसभा गाजली
ठळक मुद्देगावात ३०९ शौचालय मंजूर झाले असून याकामी तीन ठेकेदार नेमण्यात आले होते