ग्रामपंचायत प्रशासनाकडून बोअरवेल
By Admin | Updated: May 20, 2017 00:50 IST2017-05-20T00:49:17+5:302017-05-20T00:50:06+5:30
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून बोअरवेल
लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गावातील नागरिकांनी व महिलावर्गाने कळवण तालुका भाजपा उपाध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर गेल्या मंगळवारी संतप्त महिलांचा हंडा मोर्चा निघाला होता. याबाबतचे वृत्त दि. १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी मोरे यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावला. सरपंच दादाजी सुर्यवंशी, दादा मोरे, अशोक देशमुख, रविकांत सोनवणे, मोतीराम पवार, मंगेश देसाई यांनी तातडीने बोअरवेल करून जलपरी बसवली आणि विधिवत पूजा करून पाणी काढले. गेल्या पंधरा दिवसांपासून ओतूर गावात चार दिवसाआड पाणी येत होते.
गावात प्रथमच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते व हंडा मोर्चाही निघाला होता. ग्रामपंचायतीने शेजारील शेतकऱ्यांच्या विहिरीही अधिग्रहित केल्या आहेत. तरीही पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. गेल्या आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. असे असले तरी कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. यावेळी ग्रामसेवक पवार, शांताराम पवार, मंगेश देसाई, भास्कर चित्रे, किरण मालपुरे आदि उपस्थित होते़