पदवीधरांची नोंदणी १ नोव्हेंबरपासून
By Admin | Updated: September 29, 2015 00:25 IST2015-09-29T00:24:47+5:302015-09-29T00:25:03+5:30
पुढच्या वर्षी निवडणूक : छायाचित्रही करणार गोळा

पदवीधरांची नोंदणी १ नोव्हेंबरपासून
नाशिक : विधान परिषदेच्या विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून येत्या १ नोव्हेंबरपासून पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यात येणार असून, गेल्या निवडणुकीसाठी नाव नोंदविलेल्या मतदारांना मात्र पुन्हा नाव नोंदणीची आवश्यकता नसेल.
सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व डॉ. सुधीर तांबे करीत आहेत. २०१० मध्ये या मतदारसंघासाठी निवडणूक होऊन पारंपरिक भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कॉँगे्रसने हिसकावून आणला होता. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर असे पाच जिल्हे कार्यक्षेत्र व मतदार असलेल्या या मतदारसंघातील निवड सहा वर्षांसाठी असते. डिसेंबर २०१६ मध्ये विद्यमान सदस्याची मुदत संपुष्टात येणार आहे. १ नोव्हेंबर २०१२ पूर्वी पदवी प्राप्त केलेल्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल. १ ते १६ नोव्हेंबर या दरम्यान मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, १ नोव्हेंबर रोजी सध्याची मतदार यादीही प्रारूप म्हणून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना पुन्हा नाव नोंदणीची गरज नाही, मात्र यादीत काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. ज्या मतदारांचे यादीत छायाचित्र नाही, त्यांच्याकडूनही केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकरवी (बीएलओ) छायाचित्र गोळा केले जाणार आहे.