पदवीधर निवडणुकीची अधिसूचना जारी
By Admin | Updated: January 11, 2017 01:23 IST2017-01-11T01:23:22+5:302017-01-11T01:23:44+5:30
पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

पदवीधर निवडणुकीची अधिसूचना जारी
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अधिसूचना जारी केली असून, मंगळवारपासून नामांकन भरणे सुरू केले असले तरी, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक होऊन त्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याची मुदत १७ जानेवारीपर्यंत असून, १८ रोजी छाननी व २० रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. ३ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये मतदान घेण्यात येणार असून, ६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाईल. या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असली तरी, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. एकनाथ डवले, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.
एक- दोन दिवसात महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने व त्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवरच प्रामुख्याने असल्यामुळे पदवीधर मतदारसंघासाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना नेमण्यात आले असले तरी, त्यांच्याकडे नामांकन न दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख रामदास खेडकर यांनी कक्षाशी संलग्न अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यात निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.