चोरट्यांकडून सहा दुचाकी हस्तगत
By Admin | Updated: August 23, 2016 00:46 IST2016-08-23T00:45:55+5:302016-08-23T00:46:50+5:30
पाठलाग : इंदिरानगर पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या

चोरट्यांकडून सहा दुचाकी हस्तगत
इंदिरानगर : दुपारच्या सुमारास परिसरात गस्तीवर असलेल्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाला एका दुचाकीवरून तिघे संशयित फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या पाठलाग करत तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.२१) गुन्हे शोध पथक दुपारी कलानगर परिसरातून गस्त घालत होते. यावेळी तिघे संशयित एका दुचाकीवरून परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने दुचाकीचा पाठलाग सुरू केला असता चोरट्यांनी गल्ली बोळातून दुचाकी हिरो होंडा सिडी डिलक्स (एमएच १९ डीएन ९९५६) दामटवित वडाळा पाथर्डी रस्त्याने सुसाट नेली. यावेळी पोलिसांनीही वाहनाचा वेग वाढवून तत्काळ साईनाथनगर नाकाबंदी पॉइंटला बिनतारी संदेश यंत्रणेवरुन ‘अलर्ट कॉल’ दिला. दरम्यान, पथकाने रथचक्र चौकात गतिरोधकाच्या प्रारंभी दुचाकी अडविली. तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांची मध्यरात्रीच्या सुमारास कसून चौकशी केली असता चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. संशयित दुर्गेश ऊर्फ सागर सुभाष दवंडे (२१, माउली बंगला, (वॉचमन खोली) पाथर्डी फाटा) याच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सहा दुचाकी मिळून एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेख यांच्यासह गुन्हे शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. (वार्ताहर)