घरफोड्यांकडून २२ तोळे सोने हस्तगत
By Admin | Updated: July 16, 2017 00:34 IST2017-07-16T00:34:37+5:302017-07-16T00:34:51+5:30
नाशिक : सराईत गुन्हेगार तपासणीची धडक मोहीम गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने शहर व परिसरात राबवून गुप्त माहितीच्या आधारे दोन अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या.

घरफोड्यांकडून २२ तोळे सोने हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सराईत गुन्हेगार तपासणीची धडक मोहीम गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने शहर व परिसरात राबवून गुप्त माहितीच्या आधारे दोन अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून २२ तोळे सोने, ३२० ग्रॅम चांदीसह एक मोटार, दुचाकी असा एकूण ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सातत्याने सर्वच पोलीस ठाणे व गुन्हे शोध पथक प्रयत्नशील होते. युनिट-१ च्या पथकाने दोन, तर युनिट-२च्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये किमतींच्या दागिण्यांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सराईत गुन्हेगार शंकर नागेश पुजारी (२८, रा. रामवाडी) गणेश बाजीराव केदारे (२६,रा. म्हसरूळ) या दोघांना जुन्या सीबीएस बसस्थानकाच्या आवारात सापळा लावून शिताफीने अटक केली. त्यांनी भद्रकाली, उपनगर, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्ये केलेल्या विविध घरफोड्यांची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली फोर्ड कंपनीची मोटार (एम.एच.२० ए.वाय १८२०) मोपेड दुचाकीसह (एम.एच. १५ डीई ७२५६) २२ तोळे सोने, ३२० ग्रॅम चांदी, असा एकूण ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तडीपार गुन्हेगारास अटक
सराईत गुन्हेगार गिन्न्या उर्फ अनिल दशरथ पिठेकर (२३,रा. लेखानगर) हा येत्या आॅक्टोबरपर्यंत हद्दपार होता. मात्र तो शहरात वावरत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार सीबीएस स्थानकाच्या परिसरात सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. गिन्न्याकडून घरफोड्यांचे चार गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी एकूण २३० ग्रॅम वजनाच्या सहा लाख २१ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या प्रत्येकी तीन लगडी, असा मुद्देमाल जप्त केला आहे. गिन्न्या येत्या गुरुवारपर्यंत (दि.२०) पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून घरफोड्यांचे गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याबाबत पुढीत तपास सहायक निरीक्षक गंगाधर देवडे करीत आहेत.