पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह सज्ज
By Admin | Updated: October 7, 2014 01:50 IST2014-10-07T01:49:48+5:302014-10-07T01:50:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विश्रामगृह सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह सज्ज
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नाशिक भेटीवर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रशासनाने शासकीय विश्रामगृह सज्ज ठेवले असून, राष्ट्रपतींसाठी राखीव असलेल्या विशेष सूटमध्ये सर्व व्यवस्था पुरविण्यात आली आहे, तर शिवनेरीमध्ये रेड कार्पेट टाकण्यात आलेले आहे. पावसामुळे मोदी यांचा रविवारचा दौरा रद्द झाल्यानंतर आता ते मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता ओझर विमानतळावर येत आहेत. जाहीर सभा आटोपून मोदी साधारणत: दहा वाजेच्या सुमारास पुन्हा त्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्याप्रमाणे दिल्लीकडे रवाना होणार असले, तरी ऐनवेळी दौऱ्यात बदल झाल्यास मोदी नाशिक मुक्कामी थांबण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी व्यवस्था केली आहे. त्यासाठी शासकीय विश्रामगृह सज्ज ठेवण्यात आले. त्याची स्वच्छता, वीज, पाणी, टेलिफोन, इंटरनेट सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच जेवणाची वेळ आलीच, तर त्याचीही माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. राष्ट्रपतींसाठी उभारण्यात आलेल्या विश्रामगृहात मोदी यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याने त्याचा ताबा विशेष सुरक्षा दलाने घेतला आहे. त्याचबरोबर शिवनेरी विश्रामगृहातही सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. मोदी यांच्या समवेत केंद्रीय मंत्री येण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्याही निवासाची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण विश्रामगृहात रेड कार्पेट टाकण्यात आले आहे. शिवनेरी व प्रतापगड या दोन ठिकाणी मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृहाच्या आत व बाहेर सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, दोन दिवसांपासून पंतप्रधान यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींशिवाय अन्य व्यक्तींना विश्रामगृह नाकारण्यात आले आहे.