वेदाच्या समृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील
By Admin | Updated: March 28, 2015 00:49 IST2015-03-28T00:42:07+5:302015-03-28T00:49:28+5:30
शास्त्री : वेद विद्या प्रतिष्ठानचा सन्मान सोहळा

वेदाच्या समृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील
नाशिक : देशभरातील वेद केद्रांना ऊर्जितावस्था देण्यासाठी त्यांच्या समृद्धीसाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या महर्षि सान्दीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठानचे सचिव डॉ. रूपकिशोर शास्त्री यांनी केले.
शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती महायाग व विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. शास्त्री म्हणाले की, देशभरातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सेवाभावाच्या हेतूने प्रेरित व्हायला हवे. कारण विविध धर्मांच्या लोकांची जीवनशैली जरी वेगळी असली तरी, त्यांचे मन एकत्र आणण्याची किमया वेदांच्या साहाय्याने सहज साध्य करता येऊ शकते. ‘यत्र विश्वम् भवते एक निडम’ याप्रमाणे सर्व जातीधर्माच्या लोकांचा भाव एकच असतो. त्यातच वैदिक वाङ्मयात त्याच लोकांची पूजा होत असते, जे प्रगतीचा मार्ग निवडतात. दुसऱ्याच्या दु:खाला स्वत:चे दु:ख समजणाऱ्यालाच वेदात खरा संत म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेश खैरनार (उद्योग), दीपक ठुबे (शेती), परवीन शेख (दिशा महिला संघटना), गणेश सूर्यवंशी (शिक्षण), अलीम पिरजादा (सामाजिक), अंबादास गांगुर्डे (जनसाथी सामाजिक संस्था), शरद शेजवळ (शाहीर), प्रकाश शेवाळे (पक्षिप्रेमी), लक्ष्मीकांत जोशी (आध्यात्मिक) आदिंचा विविध क्षेत्रांत योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, हिंदू मध्यवर्ती सैनिकी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, स्वामी भक्तिचरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विश्वास देवकर, शांताराम भानोसे, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पैठणे, प्रधानाचार्य रवींद्र पैठणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)