नाशिक : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे जवळपास सर्वच मंत्री, भाजपा केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शासकीय विश्रामगृह मंगळवार (दि. १७) पासूनच राखीव ठेवण्यात आले आहे. आगामी पाच दिवसांमध्ये विश्रामगृहाचे सर्व बुकिंग बंद करण्यात आले असून, यापूर्वीचे बुकिंगदेखील रद्द करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे, तर महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) नाशिक शहरात पोहचणार आहे. बुधवारी शहरातून रोड शोदेखील होणार असल्यामुळे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.महाजनादेश यात्रेचा समारोप असल्यामुळे अनेक मोठे नेते आणि भाजपाचे मंत्री उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाल्याने त्र्यंबकरोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या चारही इमारती राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसराला मंत्रालयाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. शासकीय विश्रामगृह परिसरात शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, तसेच रायगड या इमारतींमध्ये सर्व नेत्यांची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती विश्रामगृहात थांबणार असल्यामुळे विश्रामगृहाची डागडुजीदेखील करण्यात येत आहे.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नाशिकमध्ये मुक्कामी राहणार असल्याने त्यांच्यासह त्यांचा स्टाफ, सुरक्षा कर्मचारी, तसेच अन्य अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. १६ ते २० तारखेपर्यंत संपूर्ण शासकीय वसतिगृह राखीव ठेवण्याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.त्यानुसार संपूर्ण इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली देण्यात आली आहे. मंगळवार (दि.१७) पासून ते शुक्रवार (दि.२०) पर्यंत या संपूर्ण परिसराचे नियोजन आणि देखरेख जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता केवळ बांधकाम विभागाला करावी लागणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये होणारी सभा तसेच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप असा कार्यक्रम असल्यामुळे डझनभर मंत्री आणि काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिकमध्ये मुक्कामी येणार आहे, तर अनेक मंत्री हे मोदी यांच्या सभेपूर्वी काही तास अगोदर नाशिकमध्ये येण्याची शक्यता असून, तसे मंत्र्यांचे दौरे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. बुधवारी संध्याकाळपर्यंत मंत्र्यांचे दौरे निश्चित होणार असून, त्यानुसार जिल्हा प्रशासनाला नियोजनाची धावपळ करावी लागणार आहे. पोलीस प्रशासनाला बंदोबस्ताची कसरत करावी लागणार आहे.
शासकीय विश्रामगृह पाच दिवस मंत्र्यांसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:31 IST
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे जवळपास सर्वच मंत्री, भाजपा केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शासकीय विश्रामगृह मंगळवार (दि. १७) पासूनच राखीव ठेवण्यात आले आहे.
शासकीय विश्रामगृह पाच दिवस मंत्र्यांसाठी राखीव
ठळक मुद्देपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा दौरा विश्रामगृहाला येणार मंत्रालयाचे स्वरूपअनेक मंत्री नाशिकमध्ये दाखल