शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी’
By Admin | Updated: November 10, 2015 23:20 IST2015-11-10T23:19:51+5:302015-11-10T23:20:37+5:30
शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी’

शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी’
नाशिक : बुधवारच्या लक्ष्मीपूजनापासून सलग पाच दिवस शासकीय कार्यालयांना सुटी असल्यामुळे मंगळवारी कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ दिसून आली. अनेक कर्मचाऱ्यांनी खातेप्रमुखांना दिवाळी भेट देत शुभेच्छा दिल्या, तर काही अधिकाऱ्यांनीच कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देत दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला.
राज्य सरकारने दिवाळी सणासाठी लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज असे तीन दिवस सुटीचे जाहीर केले असून, लागूनच दुसरा शनिवार व रविवार आल्यामुळे शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना सलग पाच दिवस दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारी कधी एकदाचे कार्यालयातील काम आटोपते, अशा मानसिकतेतच कर्मचारी होते, तशीच काहीशी परिस्थिती अधिकारी वर्गाची दिसून आली.
अनेक अधिकारी पर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांनाही मूळ गावी परतण्याची आस लागल्याने अनेकांनी दुपारनंतरच कार्यालय सोडले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच, त्यांना शुभेच्छा देण्यासाठीदेखील संबंधितांनी कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. सलग पाच दिवस सुट्यांमुळे शासकीय कार्यालयांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.