सरकारला पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही : विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 23:16 IST2015-11-08T23:15:42+5:302015-11-08T23:16:39+5:30
सरकारला पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही : विखे

सरकारला पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही : विखे
नाशिक : नगर व नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पिण्यासाठी पाणी सोडणे गैर नसले तरी, याबाबत राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची आवश्यकता होती़ पाणीप्रश्नाचे गांभीर्य नसल्याने व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अधिकारी एस़ व्ही़ सोडल यांचा हट्ट पुरविण्यासाठीच राज्य सरकारने पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली़
जायकवाडी धरणाचा ५ टक्के जिवंत व २७ टक्के मृत असा ३२ टक्के साठा आहे़ मात्र त्याचा वापर करण्यासाठी जी इच्छाशक्ती हवी आहे ती सरकारकडे नाही़ नगर व नाशिकमधील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही झाली होती; मात्र त्यांनी गांभीर्याने या प्रश्नाकडे बघितलेच नाही़
मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी हे सोडलेच पाहिजे यामध्ये मराठवाडा विरुद्ध नाशिक- नगर असा प्रादेशिक वाद आणणे चुकीचे आहे़ त्याऐवजी सर्वांनी एकत्र बसून यावर चर्चा करणे गरजेचे आहे़ धरणक्षेत्रातच पाऊस कमी पडल्याने धरणातील साठादेखील कमी आहे़ धरणातून पाणी सोडल्यानंतर, तसेच जनतेसह संपूर्ण व्यवस्थाच कोलमडल्यानंतर यावर चर्चा उपयोगाची नाही़
नाशिक व नगरमधील धरणक्षेत्रांमध्ये धरणे बांधू नयेत, असे कायद्यातच असल्याचे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी सांगतात़ मात्र नंतर करण्यात आलेल्या धरणांची परवानगी ही पूर्वीचीच आहे, मात्र निधीअभावी त्यांचे काम रखडलेले होते़ न्यायालयाच्या निकालाचे कारण पुढे करून अधिकारी आपली नोकरी बचावची भूमिका घेत आहेत़
नाशिकचे पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन यांच्यावर नाशिककरांची जबाबदारी आहे़ मात्र पाणी सोडण्याच्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही़ राज्य सरकारने ज्या एस़ व्ही़ सोडल या अधिकाऱ्याच्या हट्टापायी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून, चौकशीचे आदेश दिल्याचेही विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ या पाणीप्रश्नावर पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री महाजन यांनी चर्चा घडवून आणण्याची गरज असल्याचे विखे म्हणाले़ (प्रतिनिधी)