मालेगाव परिसरातील सर्पमित्रांची शासनाकडून उपेक्षाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST2021-08-13T04:17:41+5:302021-08-13T04:17:41+5:30

मालेगाव : गेल्या २० वर्षांपूर्वी सर्पमित्रांना नाशिक वनविभागाकडून ओळखपत्र दिले गेले. त्यानंतर अद्याप शासनाकडून ओळखपत्र दिले गेले ...

Government neglects snake friends in Malegaon area! | मालेगाव परिसरातील सर्पमित्रांची शासनाकडून उपेक्षाच !

मालेगाव परिसरातील सर्पमित्रांची शासनाकडून उपेक्षाच !

मालेगाव : गेल्या २० वर्षांपूर्वी सर्पमित्रांना नाशिक वनविभागाकडून ओळखपत्र दिले गेले. त्यानंतर अद्याप शासनाकडून ओळखपत्र दिले गेले नाही किंवा शासनाकडून सर्पमित्रांना कोणतीही राष्ट्रीय किंवा सामाजिक मदत केली जात नसल्याने त्यांची उपेक्षाच होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्पांना नागरी वस्त्यांमधून पकडून त्यांना जीवदान देऊन जंगलात सोडण्याचे काम करणाऱ्या सर्पमित्रांना शासनाने मदत करण्याची गरज आहे.

शहरातील नितीन सोनवणे या सर्पमित्राने सांगितले की, शहरात पकडलेला सर्प शहराबाहेर २० किलोमीटर अंतरावर जंगलात सोडतो. त्यासाठी वाहनाचा खर्च येतो. रोज सरासरी तीन सर्प पकडतो. त्यासाठी सटाणा, नांदगाव, नामपूर या भागातून फोन आल्यानंतर तासाभरात दाखल होतो. सर्प निघाल्यावर त्याला मारू नका, मी येईपर्यंत त्यावर फक्त लक्ष ठेवा असे सांगतो. एक सर्प पकडण्यासाठी किमान दोन जण मदतीला लागतात. सर्पाच्या वर्णनावरून तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या ऋतुमध्ये दिवसा निघाला की रात्री यावरून सर्प नक्की कोणत्या जातीचा आहे हे लक्षात येते असे त्यांनी सांगितले.

मालेगावी १७ जातींचे सर्प

मालेगाव शहर परिसरात सुमारे १७ जातींचे आढळून येतात. त्यात नाग, फुरसे आणि मण्यार हे तीनच विषारी सर्प मिळून येतात. १० कॉल आले तर त्यातील ७ हे नागाचे असतात. परिसरात विषारी सर्पाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मालेगाव शहर परिसरात दरवर्षी साधारणपणे ५ ते १० जणांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. वन्यप्राणी चावल्यामुळे शासनाकडून मदत मिळते. मात्र सर्पदंश झाल्यामुळे शासनाकडून काहीच मदत मिळत नाही. बबनराव पाचपुते हे वनमंत्री असताना त्यांनी १० लाखांचा विमा, आरोग्य खर्च शासनाकडून सर्पमित्राला देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्यावर विचार झालेला नाही. सर्पमित्रांना वनविभागाचे सहकार्य मिळत असल्याचा दावा सर्पमित्र नितीन सोनवणे यांनी केला.

दाभाडी रस्त्यावर सबस्टेशनमध्ये बारा वर्षांपूर्वी आपल्याला सर्पदंश झाला होता. वेळीच उपचार मिळाल्याने बरे झाल्याचे त्यांनी सांगितले. घरातील सदस्यांसह नातेवाईकांचा विरोध असूनही त्यांनी आपला छंद जोपासला आहे. काही मित्र प्रोत्साहन देतात तर काही विरोध करतात. न्यायडोंगरीला सातवीत असताना प्रथम सर्प पकडला होता. अकरावीला असताना ते कात्रजला गेले, तेथे अभ्यास करून आल्यानंतर त्यांनी सर्प पकडणे सुरू केले. सर्प पकडताना आधीही भीती वाटायची आणि आताही वाटते. तीन चार वर्षांत सर्पांचे प्रमाण वाढले आहे. पकडलेल्या सर्पांची नोंद वनविभागात करावी लागते. लॉकडाऊनमुळे बंद असल्याने सर्पांची नोंद करता आली नाही. यात अडचणी आल्या. सर्प डूख धरत नाही किंवा दूधही पीत नाही. मात्र, आपण नागपंचमीला वारुळात दूध टाकून त्याची नासाडी करत असल्याचे नितीनने सांगितले.

सर्पांची तस्करी होत असल्याने धूळ नागीणसारख्या सर्पांची जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हरणटोळ, अजगरदेखील मालेगाव परिसरातून नामशेष होत आहेत. सर्वात मोठा साप (धामण) १० फूट चार वर्षांपूर्वी त्यांनी पकडली होती. अर्धवट मृत सर्पावर उपचार करून जंगलात साेडतात. मालेगावी शहर पोलीस ठाण्यात जास्त सर्प निघतात. त्यामुळे पोलीस घर सोडून इतरत्र राहायला जातात. शासनाने सर्पमित्रांना आर्थिक मदत करावी असे त्यांनी शेवटी सांगितले.

Web Title: Government neglects snake friends in Malegaon area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.