पूरग्रस्तांना मदत देण्यास सरकार अपयशी
By Admin | Updated: August 14, 2016 02:34 IST2016-08-14T02:34:38+5:302016-08-14T02:34:50+5:30
माणिकराव ठाकरे : तातडीने मदतीच्या सरकारला सूचना करणार

पूरग्रस्तांना मदत देण्यास सरकार अपयशी
नाशिक : नाशिकसह राज्यभरात पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यास सरकार अपयशी ठरत असून, आपण सरकारला या नुकसानग्रस्त भागाला तातडीने मदत करण्याच्या सूचना करणार आहोत, अशी माहिती विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी (दि. १३) गोदाकाठी असलेल्या चांदोरी, सायखेडा, करंजगाव, चापडगाव या ग्रामीण भागाचा, तसेच शहरातील पंचवटी अमरधाम, सराफबाजार, कापडबाजार, एरंडवाडी आदि भागांचा दौरा करून गोदावरीच्या पूरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
ग्रामीण भागात गोदाकाठच्या जवळपास ३५ ते ४० गावांचे पुरामुळे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यात घरांची पडझड, उसाच्या पिकाचे नुकसान यांसह अन्य बाबतीत झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाही. सरकार १० दिवस उलटले तरी पोहोचू शकलेले नाही. आपण स्थानिक तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीचे व मालमत्तेचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
पंचनाम्यांचा अहवाल आल्यावर आपण सरकारकडे नुकसान भरपाईसाठी तातडीने देण्यासाठी सांगणार आहोेत. शहरातही गोदाकाठच्या परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. सराफबाजार, कापडबाजारात पाणी शिरल्यामुळे २००८ साली जशी नुकसानभरपाई मिळाली होती, तशी भरपाई आता देण्याची संबंधितांनी आपल्याकडे मागणी केली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, संजय चौपाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, शाहू खैरे, उद्धव पवार, सुरेश मारू, बबलू खैरे, गुलाम शेख, सुनील आव्हाड, स्वप्नील पाटील, नरेश पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)