सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
By Admin | Updated: August 7, 2016 23:51 IST2016-08-07T23:51:14+5:302016-08-07T23:51:40+5:30
पालकमंत्री : खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
नाशिक : सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, लासलगाव बाजार समितीच्या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे मागे घेतले जातील. शासन निर्णयानुसारच लिलावप्रक्रिया राबविणे व्यापाऱ्यांवर बंधनकारक असून व्यापारीवर्गाचे आडमुठे धोरण खपवून घेतले जाणार नाही असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीसाठी महाजन आले असता निफाड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीच्या सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. अहमदनगरसह इतर जिल्ह्यांच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमध्ये लिलावप्रक्रिया राबविली जावी या मागणीसाठी लासलगाव बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी लाठीमार करून आंदोलन मोडून काढळ्याने शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे व तत्काळ सर्व बाजार समित्यांमधील कामकाज सुरळीत करून अहमदनगरच्या धर्तीवर लिलावाची प्रक्रिया राबविणे व्यापाऱ्यांवर बंधनकारक करावे अशी मागणी जमलेल्या शेतकऱ्यांनी महाजन यांच्याकडे केली आहे. यावेळी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, बाबासाहेब गुजर, राजाभाऊ दरेकर, रमेश शिंदे, प्रमोद गायकवाड आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाजार समिती प्रशासनाकडून पाठराखण
लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी वेठीस धरल्यानंतर कोणीही व्यापारी, समितीचे पदाधिकारी चर्चेसाठी आले नाही. त्यानंतर संध्याकाळी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला, तर प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणाला बाजार समित्यांच्या प्रशासनकडून साथ मिळत असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी महाजन यांच्याशी बोलताना केला. आडतमुक्तीचा शासनाचा निर्णय व्यापाऱ्यांना मान्य नसल्यामुळे ते लिलावप्रक्रिया खोळंबून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याने नानासाहेब पाटील यांनी सांगितले.