सरकारी रुग्णवाहिका खासगी दवाखान्याच्या दारात
By Admin | Updated: September 29, 2015 00:05 IST2015-09-29T00:05:21+5:302015-09-29T00:05:57+5:30
आरोग्य समिती बैठक : जीपीएसचा मागविला अहवाल

सरकारी रुग्णवाहिका खासगी दवाखान्याच्या दारात
नाशिक : सरकारने गोरगरिबांच्या सोयीसाठी सुरू केलेली १०८ रुग्णवाहिका सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे असून, या रुग्णवाहिका सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना नेण्याऐवजी थेट खासगी रुग्णालयात घेऊन जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे यांच्या उपस्थितीत काल (दि. २८) आरोग्य समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सिन्नर, दिंडोरी, मालेगाव व बागलाण तालुक्यात दूषित पाणीपुरवठा होत असूनही संबंधित तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात कसूर केल्याचा आरोप बैठकीत सदस्यांनी केला. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना त्यासंदर्भातील तातडीचे पत्र देण्याचे आदेश सभापती किरण थोरे यांनी दिले. दिंडोरीत पाणी खड्ड्यातून काढून पिण्यात येत असल्याने दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढल्याचे, तसेच सिन्नरला क्लोरिन पावडर नसल्याने आणि बागलाणला अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेला गळती असल्याने, तसेच निफाडला पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरमुळेच दूषित पाणीपुरवठा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्याचप्रमाणे १०८ रुग्णवाहिकेतून मागील महिन्यात जवळपास १३ टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयात नेण्यात आले? हे खासगी रुग्णालयात अपघातातील जखमी नेण्यामागे कारण काय? जीपीएस कार्यप्रणाली १०८ रुग्णवाहिकांना बसविलेली असतानाही खासगी रुग्णालयात रुग्णांना का नेण्यात येते? पुढील बैठकीत यासंदर्भात जीपीएस कार्यप्रणालीचा अहवालच सादर करण्यात यावा, अशी मागणी सदस्य डॉ. भारती पवार व मनीषा बोडके यांनी केली. त्यानुसार पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती किरण थोरे यांनी दिले. त्याचप्रमाणे क्षयरोग रोखण्यासाठी थुंकीचे नमुने गोळा करून तपासण्यात येतात.
या कार्यक्रमात शिरसगाव (त्र्यंबकेश्वर) येथे थुंकीचा एकही नमुना गोळा करण्यात आलेला नाही. तसेच जिल्ह्णात सर्वत्र किमान लोकसंख्येच्या तीन टक्के नागरिकांचे थुंकीचे नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट असताना हे काम १ टक्क्याच्या आसपास असल्याबाबत डॉ. भारती पवार व मनीषा बोडके यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीस सदस्य शरद माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)