११० मोकाट जनावरे मिळाली
By Admin | Updated: January 7, 2016 23:22 IST2016-01-07T23:04:39+5:302016-01-07T23:22:39+5:30
महापालिकेची चालढकल : माहिती अधिकारात उघड

११० मोकाट जनावरे मिळाली
प्रवीण साळुंके मालेगाव
येथील महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने जानेवारी २०१३ ते जानेवारी २०१५ या दरम्यान फक्त ११० मोकाट जनावरे पकडल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. या पकडलेल्या जनावरांपासून मनपाला ११ हजार रुपये फायदा झाला असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारावर २० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याची गोळाबेरीज केल्यास हा विभाग पांढरा हत्ती ठरला आहे. या उपलब्ध आकडेवारीवरून हा विभाग शहरातील मोकाट जनावरे पकडण्यात चालढकल करीत असल्याचे उघड झाले आहे.
शहरात रोज मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे शहरात फिरताना दिसतात. या जनावरांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. ही जनावरे नागरिकांचे मोठे नुकसान करत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. या जनावरांच्या बंदोबस्तासाठी मनपाने एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. या विभागात मनपात कायमस्वरूपी असलेल्या ७ ते ८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीस आहेत. या कर्मचाऱ्यांनी शहरातील मोकाट जनावरे पकडून पांजरापोळमध्ये जमा करण्याची जबाबदारी असून, त्यांना महिन्याकाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जातो; मात्र हा विभाग काम करत नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. तुषार पाटील यांनी २०१० पासून मनपाने पकडेल्या मोकाट जनावरांची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या व त्यापासून मिळालेले उत्पन्न याची माहिती माहिती अधिकारात विचारली
होती.
या माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात संबंधित विभागाने २०१३ ते जानेवारी २०१५ या दोन वर्षांच्या काळात ११० जनावरे पकडली असून, त्यातून ११ हजार रुपये मिळाले आहेत. त्यापूर्वी पकडण्यात आलेल्या जनावरांची माहिती न दिल्याने या काळात एकही जनावर पकडण्यात आले नसल्याचे बोलले जाते.