गौप्यस्फोट : गिरीश महाजन यांची सार्वजनिक धूम्रपानावर टीका
By Admin | Updated: July 1, 2015 23:34 IST2015-07-01T23:34:08+5:302015-07-01T23:34:30+5:30
आमदारच मारतात विधानसभेत ‘पिचकारी’

गौप्यस्फोट : गिरीश महाजन यांची सार्वजनिक धूम्रपानावर टीका
नाशिक : सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिण्यास आणि तंबाखू खाऊन थुंकण्यास तीन हजारांचा दंड करण्याचा कायदा असताना अधिवेशनकाळात चक्क आमदारच सिगारेट ओढतात आणि विधानसभेत सभागृहात पिचकाऱ्या मारतात, असा सनसनी गौप्यस्फोट जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
आता महाजन या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेत कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक किस्से उघड केले. हगणदारीमुक्त अभियान राबवित असताना खान्देशात मात्र सकाळी गावोगावी रस्त्याच्या उत्तरेला पुरुष आणि पूर्वेला महिला उघड्यावर शौचास बसलेल्या दिसतात. परदेशात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असून, साधा कागदाचा कपटाही रस्त्यावर फेकला जात नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आणि धूम्रपान करण्यास दंड आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही भारत सरकारच्या स्वच्छता कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आणि सिगारेट ओढणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि तीन महिने साफसफाई आणि स्वच्छतेची शिक्षा करण्याचा कायदा केला. हा निर्णय होत नाही तोच बाहेर व्हरांड्यात दोन आमदार महाशय सिगारेट ओढत असल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकले. (प्रतिनिधी)