शहा विकास संस्थेच्या अध्यक्षपदी गोराणे विजयी
By Admin | Updated: April 6, 2016 23:08 IST2016-04-06T23:07:40+5:302016-04-06T23:08:04+5:30
निवड : उपाध्यक्षपदी रामनारायण कलंत्री

शहा विकास संस्थेच्या अध्यक्षपदी गोराणे विजयी
सिन्नर : शहा विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेच्या अध्यक्षपदासाठी रंगलेल्या कुरघोडीच्या राजकारणात संजय गजीराम गोराणे यांनी चुरशीच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा एका मताने पराभव केला, तर उपाध्यक्षपदी रामनारायण बद्रिनारायण कलंत्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे गटाला सात, तर आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या होत्या. निवडणूक अधिकारी सुनील गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी कोकाटे गटाकडून संजय गोराणे तर वाजे गटाकडून विजय जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्षपदासाठी कोकाटे गटाचे रामनारायण कलंत्री यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्धारित वेळेत कोणीही माघार न घेतल्याने अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. त्यात कोकाटे गटाच्या गोराणे यांनी सात मते मिळवून वाजे गटाच्या जाधव (सहा) यांचा एक मताने पराभव केला.
बैठकीस आबासाहेब जाधव, आण्णासाहेब जाधव, भाऊसाहेब जाधव, काशीनाथ जाधव, बाळासाहेब नाजगड, नवनाथ वाक्चौरे, अशोक ढमाले, बेबी आदिक, आशा म्हस्के, आनंदा जाधव आदींसह सर्व संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी गांगुर्डे यांनी अध्यक्षपदी संजय गोराणे व उपाध्यक्षपदी कलंत्री यांच्या नावाची घोषणा करताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी बी. डी. जाधव, के. पी. जाधव, वामन जाधव, गणेश जाधव, रवींद्र जाधव, शरद जाधव, बाळासाहेब बहिरट, भाऊसाहेब म्हस्के, शाम म्हस्के, बाबासाहेब भवर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सचिव विजय ताजणे यांनी निवडणूक कामात सहाय्य केले.
अध्यक्षपदासाठी रंगलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे बहुमत असूनही कोकाटे गटाची सत्तेची संधी हुकणार असल्याचे चित्र होते. तथापि, अध्यक्ष निवडीच्या ऐनवेळी वाजे गटाचा एक संचालक कोकाटे गटाला येऊन मिळाल्याने त्यांना सत्ता स्थापनेत यश आले. (वार्ताहर)