राष्ट्रीय एकतेसाठी सद्भावना आवश्यक
By Admin | Updated: September 14, 2015 23:48 IST2015-09-14T23:47:16+5:302015-09-14T23:48:27+5:30
सतपालजी महाराज : मानव उत्थान सेवा समितीच्या संमेलनाची सांगता

राष्ट्रीय एकतेसाठी सद्भावना आवश्यक
नाशिक : राष्ट्रीय एकता व अखंडतेसाठी सद्भावना आवश्यक आहे, असे प्रतिपादन मानवधर्म प्रणेते श्री सतपालजी महाराज यांनी केले.
कुंभमेळ्यानिमित्त आयोजित सद्भावना संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. मानव उत्थान सेवा समितीच्या येथील हंस कल्याण धामच्या वतीने तिगरानिया रोडवर हे संमेलन झाले. देशभरातील हजारो भाविकांनी या संमेलनाचा लाभ घेतला. यावेळी सतपालजी महाराज म्हणाले, ईश्वराची प्राप्ती हा आपला उद्देश एकच असेल, तर तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकत नाहीत.
आपले महापुरु ष ज्या मार्गावर चालले, त्याच मार्गावर आपल्यालाही चालावे लागेल. सर्वधर्मसमभाव व सद्भावना ही भारतभूमीची शक्ती आहे. तिचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य असायला हवे. सद्भावनेच्या प्रसारानेच मानव समाज एकसूत्रात बांधला जाऊन ‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना खऱ्या अर्थाने साकार होईल. महापुरु षांचे विचार अंगीकारले जात नसल्याने समाजात वैमनस्य, दहशतवाद, हिंसा, भ्रष्टाचार, अनैतिकता यांसारख्या समस्या गंभीर झाल्या आहेत. केवळ कायदे बनवून या समस्यांचे निराकरण शक्य नाही. त्यासाठी अध्यात्माचीच मदत घ्यावी लागेल.
दरम्यान, संमेलनात अनेक सांस्कृतिक कार्यक्र म सादर करण्यात आले. बालकलाकारांना विभूजी महाराज, सुयशजी महाराज यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. महात्मा हरिसंतोषानंदजी यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)