‘गुड फ्रायडे’निमित्त मिरवणूक
By Admin | Updated: April 4, 2015 01:56 IST2015-04-04T01:56:16+5:302015-04-04T01:56:40+5:30
‘गुड फ्रायडे’निमित्त मिरवणूक

‘गुड फ्रायडे’निमित्त मिरवणूक
नाशिक : ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या येशू ख्रिस्तांचा ‘बलिदान दिन’ म्हणून पाळल्या जाणाऱ्या ‘गुड फ्रायडे’निमित्त शहरातील शरणपूररोड या परिसरात वधस्तंभाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ख्रिस्तीबांधवांनी ९० किलो वजनाचा व १२ फूट उंचीचा वधस्तंभ खांद्यावरून वाहून नेत हा शोकदिवस पाळला. येशू ख्रिस्तांनी ज्या दिवशी क्रुसावर आपले बलिदान दिले, तो दिवस ‘गुड फ्रायडे’ म्हणून पाळला जातो. ख्रिस्तीबांधवांची शहरात पाच ते सात प्रमुख प्रार्थनास्थळे असून, तेथे यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शरणपूररोड येथील संत आंद्रिया चर्चमध्ये प्रवचनामध्ये दुपारी १२ ते ३ या वेळेत फादर रमेश घोरपडे यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी वधस्तंभावर येशूंनी उच्चारलेल्या ‘हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही’, ‘मी तुला खचित खचित सांगतो, आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील’, ‘बाई, पहा हा तुझा मुलगा, मुला पहा ही तुझी आई’, ‘माझ्या देवा! तू माझा त्याग का केला?’, ‘मला तहान लागली आहे’, ‘पूर्ण झाले आहे’, ‘हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो’, या सात वाक्यांवर प्रवचन दिले. (प्रतिनिधी)