चांगली ग्राहकसेवा हे व्यवसायाच्या वाढीमागील गमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:56+5:302021-06-20T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : ग्राहकांना चांगली सेवा मिळत असल्यास ते संतुष्ट राहतात. यामधूनच या ग्राहकांकडून पुन्हा मिळणारी ऑर्डर ...

चांगली ग्राहकसेवा हे व्यवसायाच्या वाढीमागील गमक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्राहकांना चांगली सेवा मिळत असल्यास ते संतुष्ट राहतात. यामधूनच या ग्राहकांकडून पुन्हा मिळणारी ऑर्डर वा त्यांच्यामार्फत मिळणाऱ्या नवीन ग्राहकांमुळे व्यवसायाची वृद्धी होते. व्यवसायाच्या चांगल्या वाढीमागे ग्राहकांना समाधान देणारी सेवाच प्रमुख असते, असे मत शहरातील विविध क्षेत्रामधील कार्यरत व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये नाशिकमधील अनेक प्रथितयश व्यावसायिकांनी वरील मत व्यक्त केले. या चर्चेमध्ये साची होंडाचे संचालक दिनेश वराडे, कांचनपुष्प जेम्स ॲण्ड डायमंडसचे संचालक दिनेश धोका, कार मॉलचे संचालक कपिल नारंग, ब्रिजमोहन टूर्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी, साधना मिसळचे संचालक राजन आमले आणि सुला विनियार्डस्चे वरिष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे यांनी सहभाग घेतला. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक उपाध्यक्ष बी.बी, चांडक यांनी या मान्यवरांशी संवाद साधला.
ग्राहकसेवा ही कोणत्याही व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाची असते. कोरोना साथीच्या काळामध्ये याचा प्रत्यय आला. या साथीने परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपल्याला तयार केले. या काळामध्ये झालेल्या व्यावसायिक चौकशा या ग्राहकांनी दिलेल्या चांगल्या माहितीमुळेच झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले. निर्बंधांच्या काळातही ग्राहकांना ज्या सेवा देणे शक्य होते, त्या दिल्याचेही त्यांनी सांगितले. निर्बंध हटविल्यानंतर गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी लागलेल्या रांगा ही ग्राहकांच्या विश्वासाची पावती असल्याचे मत दिनेश वराडे यांनी मांडले. ग्राहकाला देव मानून त्याला संतुष्ट करण्यासाठी आपला व आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राजन आमले यांनी केले.
आजचा जमाना ऑनलाइनचा असल्याने केवळ आपल्या शहरातूनच नाही तर अनेक ठिकाणांहून ग्राहकांमार्फत चौकशी होत असल्याची बाब कपिल नारंग यांनी स्पष्ट केली. ऑनलाइनच्या जमान्यातही आपण आपले शहर, त्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याची गरज ब्रिजमोहन चौधरी यांनी अधोरेखित केली. हिरे आणि रत्नांची खरेदी करण्यापूर्वी त्याबाबत पुरेशी माहिती देण्याकडे व ग्राहकांना शिक्षित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे दिनेश धोका यांनी सांगितले.
----------------
पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चांगले दिवस
काेरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन आणि हॉटेल या दोन उद्योगांना बसला आहे. मात्र आगामी काळामध्ये या दोन्ही उद्योगांना चांगले दिवस येण्याचे संकेत मिळत असल्याचे मत मोनित ढवळे यांनी व्यक्त केले. गेली दोन वर्षे लोक अडकून पडलेले असल्याने आता निर्बंध कमी होताच ते जवळच्या ठिकाणची पिकनिक करीत आहेत. त्यामुळे हॉटेल तसेच रिसॉर्टना लाभ मिळत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.