ठेकेदारीचे चांगभलं! दहा लाखांची कामे आता विनानिविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:15+5:302021-07-17T04:13:15+5:30
नाशिक : दहा लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा मजूर सोसायट्यांना देण्याच्या शासनाच्या आदेशाची नाशिक महापालिकेतही अंमलबजावणी करण्यात येणार असून, शुक्रवारी ...

ठेकेदारीचे चांगभलं! दहा लाखांची कामे आता विनानिविदा
नाशिक : दहा लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा मजूर सोसायट्यांना देण्याच्या शासनाच्या आदेशाची नाशिक महापालिकेतही अंमलबजावणी करण्यात येणार असून, शुक्रवारी (दि.१६) झालेल्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचे भाजपच्या नगरसेवकांनी मुक्तकंठाने स्तुती करत स्वागत केले. केवळ राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी सर्व मजूर संस्था बोगस असून, ते राजकीय नेते चालवत असल्याने, त्यास विरोध केला. नाशिक महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१६) पार पडली. यात भाजप नगरसेवक तथा महाराष्ट्र मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष योगेश हिरे यांनी प्रस्ताव मांडत शासनाच्या धोरणानुसार, मजूर संस्थांना महापालिकेतही दहा लाखांपर्यंतची कामे विनानिविदा देण्याचा अशासकीय ठराव मांडला होता. यापूर्वी आमदार सीमा हिरे यांनी २०१२ मध्ये महापालिकेत अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला होता आणि तो मंजूर झाल्यानंतर पाच लाखांपर्यंतची कामे करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. मात्र, आता शासनाच्या सुधारित धेारणानुसार, दहा लाख रुपयांपर्यंतची कामे मजूर संस्थांकडून करून घ्यावी, अशी मागणी हिरे यांनी केली. शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही आता पळवाटा न शाेधता, या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. भाजपच्या प्रतिभा पवार, संभाजी मोरूस्कर यांनीही त्याला समर्थन दिले. यावेळी अन्य नगरसेवकांनीही महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले. गजानन शेलार यांनी मात्र या मजूर सोसायट्यांच्या चौकशीची मागणी केली. यावेळी शहर अभियंता संजय घुगे यांनी या संदर्भात शासनाचे आदेश प्राप्त झाले असून, आयुक्तांपुढे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, सुधारित धोरणांनुसार मजूर संस्थांना विनानिविदा दहा लाखांपर्यंतची कामे देण्याचे निर्देश महापौर कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिले.
इन्फो..
गजानन शेलार यांनी केली चौकशीची मागणी
महासभेत शासन निर्णयाच्या निर्णयावर सर्वपक्षीय एकमत होत असताना, राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी मात्र मजूर संस्थांच्या चौकशीची मागणी केली आहे. अनेक मजूर संस्था बोगस असून, मृत व्यक्तींच्या नावावर राजकीय नेतेच ही संस्था चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला, तसेच महापालिकेचे आर्थिक हित बघता, महापालिकेत निविदा काढूनच कामे करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
इन्फो...
एमएनजीएलला जागा देण्यास स्थगिती
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला गॅस डेपो आणि सीनएजी स्टेशन उभारणीसाठी जागा देण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केल्याने, हा विषय स्थगित करण्यात आला. मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे क्रमांक २८८ पैकी १३७१. ७४ चौरस मीटर व मौजे देवळाली शिवारातील भूखंड पंधरा वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, महासभेच्या मंजुरीपूर्वीच एमएनजीएलने शहरातील सर्व रस्ते खोदलेच कसे, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला, तर महापौरांनीही कंपनीच्य खोदकामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने, नाराजी व्यक्त करीत, या विषयावर पुढील महासभेत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगत हा विषय तहकूब केला.