सोने-चांदी खरेदीचा ‘सुवर्ण काळ
By Admin | Updated: November 10, 2015 23:04 IST2015-11-10T23:03:19+5:302015-11-10T23:04:00+5:30
मागणी वाढली : स्थिरावला दर; नाणी, दागिने खरेदीकडे कल

सोने-चांदी खरेदीचा ‘सुवर्ण काळ
नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या विजयादशमीला सोन्याचे दर प्रति तोळा २७ हजारांच्याही पुढे गेले होते; मात्र त्यानंतर पंधरवड्यात सोने-चांदीच्या दरात तेराशे ते पंधराशे रुपयाने घटले आहेत. त्यामुळे नागरिकांचा विशेषत: महिलावर्गाचा सोने-चांदी खरेदीकडे कल वाढला आहे. एकूणच पूजाविधी, हौस, गुंतवणूक अशा तीनही कारणांसाठी नागरिकांकडून सुवर्ण खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने यावर्षी दिवाळीचा हंगाम सोने-चांदीच्या खरेदीचा
‘सुवर्ण काळ’ ठरत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव जवळपास चार ते साडेचार हजार रुपयांनी कमी झाला आहे. गेल्या वर्षी दसरा-दिवाळीच्या हंगामात २८ ते ३० हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत सोन्याचे भाव पोहचले होते. यावर्षी मात्र धनत्रयोदशीपासून शहरातील सोन्याच्या बाजारात शुद्ध सोन्याचे दर २६१०० ते २६३०० रुपयांपर्यंत स्थिरावले आहेत. शुद्ध सोने अर्थात २३.९० ते २३.९५ कॅ रेटपर्यंत प्रति तोळा २६२५० ते २६३५० रुपयांपर्यंत, तर चांदीचा दर प्रति किलो ३६००० ते ३६९०० रुपयांवर स्थिरावला आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या औचित्यावरदेखील सुवर्ण बाजारात दरवाढ अधिक होणार नसल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.