सोन्याची दुकाने उघडली
By Admin | Updated: April 13, 2016 23:33 IST2016-04-13T23:26:38+5:302016-04-13T23:33:40+5:30
खरेदी-विक्री सुरू : दुकानदार, ग्राहकांमध्ये उत्साह; कारागिरांना रोजगार

सोन्याची दुकाने उघडली
नाशिक : सराफ असोसिएशनने अबकारी करविरोधातील ४२ दिवसांचा बंद मागे घेतल्यानंतर काही सुवर्णकारांनी मंगळवारी दुकाने उघडली. सराफ असोसिएशनने गुरुवारी दुकाने उघडण्याचा निर्णय बदलून बुधवारी (दि. १३) सर्व सुवर्णकारांना दुकाने उघडण्याचे आवाहन केल्याने गुरुपुष्यामृत योगच्या पार्श्वभूमीवर सराफांनी मंगळवारी व बुधवारी दुकानांची मांडणी व साफसफाई केली. सराफांची दुकाने उघडल्याने ग्राहकांमध्ये उत्साह दिसला.
लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोन्याची खरेदी केली, तर गुरुपुष्यामृत योग साधण्यासाठी सोन्याची खरेदी उद्यावर ढकलल्याने गुरुवारी शहरातील सराफांची दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेलेले पहायला मिळतील. दरम्यान, सराफ बाजार सुरू झाल्याने येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या कारागिरांनाही रोजगार मिळाला आहे.
सराफांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने सोन्याला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झाली असून लग्नसराईच्या अखेरच्या टप्प्यात का होईना सुवर्णकारांची दुकाने उघडल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. अबकारी कराच्या विरोधात देशभरातील छोटेमोठे सुवर्णकारांनी २ मार्चपासून शटर डाउन केलं होतं; मात्र सराफांनी नरमाईची भूमिका घेऊन बंद मागे घेत १४ एप्रिलपासून दुकाने उघडणार असल्याचे सराफ संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले. काही व्यावसायिकांनी बंद मागे घेण्याची घोषणा होताच मंगळवारी दुकाने उघडल्याने उर्वरित व्यावसायिकांनाही बुधवारपासून दुकाने उघडण्याचे आवाहन महाराष्ट्र सराफ असोसिएशनतर्फे करण्यात आले. त्यामुळे सराफबाजारासह शहरातील सर्व दुकाने उघडल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
४२ दिवसांच्या संपानंतर दुकाने उघडल्याने अजून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसला तरी गुरूपुष्यामृत योगाच्या निमित्ताने गुरुवारी चांगली खरेदी होईल,अशी आशा सराफांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)