सोने लुटीतील संशयितांचे धागेदारे सापडले
By Admin | Updated: April 26, 2015 00:56 IST2015-04-26T00:51:58+5:302015-04-26T00:56:46+5:30
सोने लुटीतील संशयितांचे धागेदारे सापडले

सोने लुटीतील संशयितांचे धागेदारे सापडले
नाशिक : वाडीवऱ्हेजवळ पाच तोतया पोलिसांनी लुटलेल्या सोळा कोटी २३ लाखांच्या सोन्याच्या लुटीचे धागेदारे हाती लागल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे़ चोरट्यांच्या शोधासाठी सात पथके पाठविण्यात आली असून, त्यापैकी दोन परराज्यात तर पाच मुंबईमध्ये पाठविण्यात आली़ दरम्यान, टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली जात असल्याचेही मोहिते यांनी सांगितले़ ‘झी’ गोल्ड कंपनीचे ६० किलो सोने (एक-एक किलो सोन्याचे बार) शिरपूरच्या रिफायनरीमध्ये पोहोचविण्याचे काम अंधेरी येथील सिक्वेल सिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते़ त्यानुसार गुरुवारी (दि़२३) रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास सिक्वेल सिक्युअर कंपनीचे वाहन (एमएच ०२ सीई ४०१०) हे साठ किलो सोने घेऊन निघाले़ वाहनामध्ये कंपनीचे सुरक्षा अधिकारी समीर मन्वर पिंजारा, वाहनचालक नावेद अहमद, सुरक्षारक्षक प्रदीप दुबे व संतोष साऊ असे चौघे होते़ पहाटे तीन वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेजवळील लामसाहेब मळा, शेवाळी नाल्याजवळ पांढऱ्या रंगाची लोगान कारमधील (वरती लाल दिवा लावलेला) पाच सशस्त्र दरोडेखोरांनी अडवली़ या पाचही जणांनी ड्रायव्हर व डिलिव्हरी असिस्टंटला पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीबाहेर काढले़ तसेच पाठीमागे बसलेल्या दोन्ही सुरक्षारक्षकांना बंदुकीचा धाक दाखवून ५८ किलो सोन्याची लूट करून कारमधून पसार झाले़ यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी तपासाची सूत्रे फिरवून त्वरित नाकाबंदी केली, मात्र चोरटे फरार झाले होते़ दरम्यान, या चोरट्यांच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी सात टीम तयार केल्या असून, यातील एक टीम उत्तर प्रदेश, एक केरळ, तर उर्वरित पाच टिम मुंबईमध्ये पाठविण्यात आल्या आहेत़ याबरोबरच एका चोरट्याचे पासबुकही पोलिसांच्या हाती लागले असून, त्यादृष्टिकोनातूनही तपास सुरू करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी) --कोट-- कसारा घाटातील पायथ्याशी ज्या ठिकाणी या वाहनातील चौघे कर्मचारी चहापानासाठी थांबले त्याठिकाणचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी सुरू आहे़ तसेच सिक्वेल सिक्युअर कंपनीच्या चौघा कर्मचाऱ्यांनी लुटीतील ज्या पांढऱ्या लोगान कारचे वर्णन सांगितले़ तशीच एक कार पिंपळगाव टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली आहे़ त्या कारचा अस्पष्ट फोटो असून, त्यातील नंबर पडताळणी करून त्यादृष्टीने तपास सुरू आहे़ या लुटीतील महत्त्वाचे धागेदोरे आमच्या हाती आले आहेत़ - संजय मोहिते, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक़