सुवर्णपदक हुकल्याची खंत

By Admin | Updated: May 21, 2014 23:42 IST2014-05-21T23:37:57+5:302014-05-21T23:42:11+5:30

रुपाली यमगर : लक्ष्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे पण...

Gold medal | सुवर्णपदक हुकल्याची खंत

सुवर्णपदक हुकल्याची खंत

रुपाली यमगर : लक्ष्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे पण...
नरेश हाळणोर / नाशिक : सोलापुरातील मालवाहू टॅम्पो चालकाच्या पोरीला गेल्या चार वर्षांपासून धनुर्विद्येचे वेड लागले अन् त्यांनीही आर्थिक परिस्थिती नसताना तिची हौस भागविली, तीच रुपाली यमगर. आज झालेल्या १९ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला दुसरे स्थान पटकावून देतानाच तिचे सुवर्णपदक अवघ्या दोन गुणांनी हुकले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी हेच अंतिम लक्ष्य असलेल्या रुपालीचा धनुर्विद्या हा अत्यंत खर्चिक खेळ असल्याने प्रायोजकत्वासाठी तिची धडपड सुरू आहे.
सोलापूरची रुपाली यमगर सध्या नाशकात सुरू असलेल्या १९ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून सहभागी झाली असून, आज पहिल्याच दिवशी मुलींच्या गटातून तिच्याच कामगिरीमुळे महाराष्ट्राला दुसरे स्थान मिळाले. रुपालीने ५० मीटरमध्ये २७० गुण मिळवित कांस्य तर ३० मीटरमध्ये ३०४ गुण मिळवित रौप्य पदक मिळविले. ३० मीटर प्रकारात तिचे सुवर्ण पदक अवघ्या एका गुणाने हुकले, तर सर्वसाधारण गटाचे सुवर्ण दोन गुणाने हुकल्याची खंत तिने बोलून दाखविली. गेल्या चार वर्षांपासून सराव करीत असल्याचे सांगत आजचा दिवस खूपच छान राहिला असला तरी त्यामागे गेल्या चार वर्षांचे कष्ट आहेत. खूप सराव केला, त्यासाठी परिश्रम घेतले तेव्हा आजचे यश मिळाले. राष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच यश असल्याने ते खूप महत्त्वाचे असल्याचे रुपाली यमगर म्हणाली.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी रुपालीने चांगल्या दर्जाचे रिक्व्हर बो मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केल्यानंतर तिला ते मिळाले आणि त्या बळावरच तिने आजचे यश नोंदविले. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशीच कामगिरी करायची असेल तर अमेरिकन बांबूपासून तयार केलेला रिक्व्हर बो गरजेचा आहे. त्यासाठी खेळाडूंना प्रायोजकाची गरज भासते. परंतु अशा खेळांसाठी खूप कमी प्रायोजक मिळतात. ते मिळाले तरच आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडण्यास मदत होईल, असेही रुपाली म्हणाली.

प्रायोजकत्वाची अत्यंत गरज
धनुर्विद्या हा खेळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत खर्चिक असून, इंटरनॅशनल रिक्व्हर बो असेल तरच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळू शकते. त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. इंडियन रिक्व्हर बोमुळे भारतात यश मिळू शकते. त्यासाठी प्रायोजकत्वाची अत्यंत गरज असून, प्रायोजक मिळाल्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाचे नाव झळकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. चांगला प्रायोजक नसताना राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचणे तसे कठीणच.
- रुपाली यमगर, धनुर्विद्या खेळाडू

Web Title: Gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.