टपाल खात्याला प्रतीक्षा सुवर्ण मुद्रेची
By Admin | Updated: November 10, 2015 23:31 IST2015-11-10T23:29:39+5:302015-11-10T23:31:17+5:30
नाणे विक्री मात्र बंद : सुवर्ण रोखे उपलब्ध

टपाल खात्याला प्रतीक्षा सुवर्ण मुद्रेची
अझहर शेख नाशिक
तीन ते चार वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीद्वारे टपालामधून सुवर्ण नाण्यांची विक्री केली जात होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व भारतीय रिझर्व्ह बॅँके मार्फत टपालातून सुवर्ण रोखे बॉण्डच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे सुवर्ण नाण्याची विक्री पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे; मात्र अद्याप सुवर्ण नाणे उपलब्ध झाले नसल्याचे मुख्य टपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या वीस तारखेपर्यंत नाशिक मुख्य टपाल कार्यालय व नाशिकरोड टपाल उपकार्यालयात सुवर्ण रोखे उपलब्ध झाले आहेत. मात्र, या दोन्ही कार्यालयांमध्ये अद्याप सुवर्ण नाणे उपलब्ध झालेले नाही. कारण सरकारकडून सुवर्ण नाणे विक्री सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सुवर्ण रोखे उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांत सुवर्ण नाणे विक्री सुरू झाल्याचा गैरसमज पसरला होता. यामुळे काही ग्राहकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सोने गुंतवणुकीसाठी टपाल कार्यालयात धाव घेऊन सुवर्ण नाणे विक्रीची चौकशीही केली; मात्र त्यावेळी सुवर्ण रोखे योजनेची माहिती संबंधितांकडून मिळाल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला. तीन ते चार वर्षांपूर्वी रिलायन्स कंपनीमार्फत टपाल कार्यालयांमधून सोन्याची नाणी विक ली जात होती. यावेळी बहुतांश ग्राहकांनी गुंतवणूक म्हणून सोन्याच्या नाणी खरेदीला प्राधान्य दिले होते. सदर सोन्याच्या नाण्यांची विक्री सध्या बंदच आहे.