गोडसे, चव्हाण घेणार मराठीतून शपथ
By Admin | Updated: May 22, 2014 22:18 IST2014-05-22T22:18:00+5:302014-05-22T22:18:00+5:30
नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हेवीवेट उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर मात करत जायंट किलर ठरलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि ..

गोडसे, चव्हाण घेणार मराठीतून शपथ
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हेवीवेट उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर मात करत जायंट किलर ठरलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक साधणारे भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे खासदारकीची शपथ मराठीतून घेणार आहेत. दरम्यान, पुणे येथील भारत विश्व ज्ञानपीठम्चे कुलपती डॉ. विजय भटकर आणि शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना संस्कृतमधून शपथ घेण्याचे आवाहन केले आहे.
सोळाव्या लोकसभेचा कालावधी ३१ मे रोजी संपुष्टात येत असून, त्यापूर्वी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पूर्ण करावा लागणार आहे. २६ मे रोजी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार असून, त्यानंतर २७ मेपासून नव्या लोकसभेच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याने नवनिर्वाचित खासदारांकडून ते कोणत्या भाषेत शपथ घेणार याबाबतचे पत्र राष्ट्रपती कार्यालयाकडून भरून घेतले जात आहे. त्यानुसार नाशिकचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली जाणार असल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले. दरम्यान, पुणे येथील भारत विश्व ज्ञानपीठम्चे कुलपती डॉ. विजय भटकर व शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित खासदारांना पत्र पाठवून संस्कृत भाषेत शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. १९९१ मध्ये लोकसभेचे सभापती बलराम जाखड यांच्यासह ५३ सदस्यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली असून, यंदाही जास्तीत जास्त खासदारांनी संस्कृतमधून शपथ घ्यावी, यासाठी शारदा ज्ञानपीठम्चे प्रबंध संपादक वासुदेव डोंगरे स्वत: शपथविधीच्या सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून खासदारांना विनंती करणार आहेत. (प्रतिनिधी)