नवरात्र उत्सवापासून उघडणार देवाचे द्वार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:23+5:302021-09-26T04:15:23+5:30
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे दि. ७ ऑक्टोबरपासून उघडण्यात येणार असल्याने ...

नवरात्र उत्सवापासून उघडणार देवाचे द्वार !
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे दि. ७ ऑक्टोबरपासून उघडण्यात येणार असल्याने मंदिर विश्वस्तांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. कोरोनाचे संकट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी खुले होईल, याची आस लागली होती. सर्व धार्मिक स्थळे बंद केल्यामुळे इतिहासात अशी प्रथमच घटना घडली की, आदिमायेची एप्रिल महिन्यातील चैत्र उत्सव यात्रा रद्द करण्यात आली होती. मागील वर्षी मार्च महिन्यात कोविडच्या पहिल्या लाटेत मंदिरे बंद केली, त्यावेळी चैत्र व नवरात्र उत्सव हे दोन प्रमुख उत्सव रद्द करण्यात आले. सलग तीन यात्रा उत्सवांना मुकावे लागल्याने येथील व्यावसायिकांचे व देवी ट्रस्टचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
-----------------------------
७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्याबद्दल देवी संस्थानतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. मंदिर सुरू करताना अटी व शर्तींची नियमावली दिली आहे, त्या नियमांच्या अधिन राहून सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून यासंदर्भात भाविकांना सेवा पुरविण्यास तयार आहे.
- ललित निकम, विश्वस्त, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट (२५ ललित निकम)
------------------------
श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान, मौजे सुकेणे येथील मंदिर गेले दीड ते दोन वर्षांपासून बंद आहे. बऱ्याच भाविक भक्तजनांना कोविड महामारीमुळे कुचंबणा व साधनेअभावी गैरसोय सहन करावी लागली. महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार की ते मंदिरे खुली करताहेत. आमच्या संस्थानच्यावतीने कोविडचे सर्व नियम पाळून भाविकांना प्रवेश दिला जाईल.
- महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, अध्यक्ष, दत्त मंदिर संस्थान, श्रीक्षेत्र मौजे सुकेणे (२५ सुकेणकर बाबा)
-----------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल सात महिन्यांनी भाविक, भक्तांना भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घडणार असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भाविकांना आम्ही दर्शन सेवा उपलब्ध करून देऊ. गावातील सर्वच व्यावसायिकांचे धंदे सुरु होतील. पुरोहित, गाईड, हाॅटेल, लाॅजिंग, किराणा, प्रसाद वाण, माॅल, भेटवस्तू, फुल विक्रेते आदींचे व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरु होतील. प्रत्येकाला दोन पैसे मिळू लागतील. देवस्थानलादेखील उत्पन्न मिळेल. यातच आम्हाला समाधान आहे. जेणेकरुन भाविकांसाठी काही सोयी-सुविधा करता येतील.
- भूषण अनिल अडसरे, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट (२५ भूषण अडसरे)
-----------------------------
मार्चपासून मंदिर बंद होते. तेव्हापासून पुरोहितांपासून ते गवत विकणाऱ्या गरीब महिलांची रोजीरोटी बंद होती. आता मंदिर खुले होणार असल्याने हाॅटेल, लाॅजिंग, किराणा, प्रसाद वाण, फुल विक्रेते, भेटवस्तू, माॅल अशा सर्वच व्यावसायिकांना आनंद झाला आहे. दरम्यान, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आवश्यक नियमांचे काटेकोर पालन करुन भाविकांना दर्शन सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. धार्मिक विधी बंद होते, ते आता पुन्हा सुरु होतील. पण कोविड नियमांचे तंतोतंत पालन करुनच पुरोहित हे विधी करतील, अशी अपेक्षा आहे.
- संतोष सदाशिव कदम, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट (२५ संतोष कदम)
250921\25nsk_13_25092021_13.jpg~250921\25nsk_14_25092021_13.jpg~250921\25nsk_15_25092021_13.jpg
२५ सुकेणकर बाबा~२५ भूषण अडसरे~२५ संतोष कदम