‘गोदापार्क’ला पुराची झळ
By Admin | Updated: July 15, 2016 01:22 IST2016-07-15T01:11:20+5:302016-07-15T01:22:29+5:30
राज ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट : लोकार्पण लांबले अन् दौराही लांबला

‘गोदापार्क’ला पुराची झळ
नाशिक : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘गोदापार्क’ नाशिककरांना अर्पण करण्याचा मुहूर्त काही लागेना. गेल्या रविवारी (दि.१०) गोदावरीला आलेल्या पुराची झळ बसल्याने गोदापार्कची पडझड झाली असून, विद्युत पोलसह हिरवळही वाहून गेली आहे. रिलायन्स फाउंडेशनमार्फत साकारलेल्या गोदापार्कच्या लोकार्पणाची तयारी पक्षपातळीवर सुरू असतानाच गोदापार्कवर नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने शुक्रवार (दि.१५) पासून होणारा राज ठाकरे यांचा दौराही लांबला असून, त्यामुळे लोकार्पणही लांबले आहे. दरम्यान, पूररेषेत साकारलेला गोदापार्क पुन्हा एकदा त्यानिमित्ताने चर्चेत आला आहे.महापालिकेत सन २००२ मध्ये सेना-भाजपा युती सत्तारुढ झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविली होती आणि त्यावेळी दर पंधरा दिवसांनी राज यांचा मुक्काम नाशिकला पडत होता. राज ठाकरे यांनी गोदावरी नदीकाठी सुशोभिकरणाचा प्रकल्प आराखडा तयार केला आणि गोदापार्क संकल्पना जन्माला आली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सदर प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला होता.
गोदावरी नदीकाठी आसारामबापू पूल ते रामवाडी पुलापर्यंतचा सुमारे ९ कि.मी. गोदापार्क प्रकल्प साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु भूसंपादनात अनेक अडचणी येत गेल्या शिवाय राज यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर तर या प्रकल्पाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत गेले. याशिवाय, सदर गोदापार्क हा पूररेषेत असल्याने त्याचे वारंवार येणाऱ्या पुरामुळे नुकसान होणार आहे त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सन २०१२ च्या निवडणुकीत महापालिकेत मनसेने सत्ता संपादन केल्यानंतर राज यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ गोदापार्कला पुन्हा एकदा चालना मिळाली. यापूर्वी पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून साकारलेल्या गोदापार्कची वाताहत झाल्यानंतर राज यांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आसारामबापू पुलाजवळील गोदाकाठी काही भाग विकसित करण्याचे ठरविले. सुरुवातीला ५०० मीटरचा गोदापार्क सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून विकसित करण्याचा निर्णय झाला आणि दोन महिन्यांपूर्वीच गोदापार्कचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले. या गोदापार्कमध्ये हिरवळ लावण्याबरोबरच वॉक-वे, चिल्ड्रेन पार्क, आकर्षक विद्युत दीप आदि कामे पूर्णत्वाला आलेली होती. मार्च २०१७ मध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक होणार असल्याने सत्ताधारी मनसेने राज यांचा प्रमुख प्रकल्प असलेल्या ‘गोदापार्क’च्या लोकार्पणाची तयारी चालविली होती. त्यासाठी राज यांचा दि. १५ ते १७ जुलै असा दौराही निश्चित झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. परंतु गेल्या रविवारी शहराला जोरदार पावसाने झोडपल्याने गोदावरीला मोठा पूर आला. त्याची झळ ‘ड्रीम प्रोजेक्ट’ गोदापार्कला बसून त्याची वाताहत झाली.