गोदापात्रात सरसकट कॉँक्रीट घाट नको

By Admin | Updated: June 29, 2014 00:48 IST2014-06-29T00:21:10+5:302014-06-29T00:48:27+5:30

हेमंत गोडसे : गोदाघाट सुशोभीकरण व पर्यटनाच्या दृष्टीने हवा ‘लॅन्डस्केप’

The godown does not have the most concrete ferries | गोदापात्रात सरसकट कॉँक्रीट घाट नको

गोदापात्रात सरसकट कॉँक्रीट घाट नको

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून गोदापात्रात एका बाजूने सुमारे बाराशे मीटरचा सरसकट कॉँक्रीटचा घाट बांधला जात आहे हे अत्यंत चुकीचे असून, केवळ कुंभमेळ्यापुरता घाटाचा विचार न करता प्रशासनाने कायमस्वरूपी या घाटाला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित कसे करता येईल व गोदापात्रात कॉँक्रीटचे जंगल आगामी काळात पर्यटकांना दिसणार नाही, याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी पाहणी दौऱ्याप्रसंगी सांगितले.
कुंभमेळ्याच्या औचित्यावर येणारे लाखो भाविक दक्षिणगंगा अर्थात गोदावरीत स्नान करतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी नदीपात्रात टाळकुटेश्वर पुलापासून थेट गोदावरी-कपिला संगमापर्यंत व त्यापुढे टाकळी गावाजवळ गोदा-नासर्डी (नंदिनी) संगमापासून पुढे चारशे मीटर म्हणजेच सुमारे एक हजार सहाशे मीटर लांबीचा आणि वीस मीटर रुंदीचा कॉँक्रीट घाट सरसकट बांधण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्रात कायमस्वरू पी कॉँक्रीट तपोवन बघण्यासाठी सातत्याने येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेस पडेल. या घाटावरती कुंभमेळा आटोपल्यानंतर होणारे गैरप्रकार पोलीस यंत्रणेबरोबर मनपासाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात घाट बांधताना तो ठिकठिकाणी खंडित (पंक्चर) करावा व त्या जागेमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने व नाशिकची प्रतिमा उंचविण्यासाठी उत्कृष्ट पद्धतीने नैसर्गिक रमणीय भूप्रदेश साकारला जाऊ शकतो व त्या दृष्टीने मी प्रयत्नशील असल्याचे गोडसे यांनी यावेळी सांगितले. लवकरच याबाबत लॅण्डस्केप निर्मितीकारांकडून आराखडा मागविणार असून मनपा, जलसंपदा, जिल्हा प्रशासन यांच्या आगामी संयुक्त बैठकीमध्ये तो सादर करणार असल्याचे गोडसे म्हणाले. संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन पर्यटन व गोदापात्र सुशोभीकरणासाठी घाटाचा उपयोग कसा करून घेता येईल, याविषयीची चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी ‘आपलं पर्यावरण नाशिक समूहा’ला दिले. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, पूर्व प्रभाग सभापती कुणाल वाघ, शेखर गायकवाड, दीपक जाधव, जलसंपदाचे सागर शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The godown does not have the most concrete ferries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.