पोलिसांच्या तटबंदीने गोदाकाठ सुनसान
By Admin | Updated: July 12, 2015 00:09 IST2015-07-12T00:06:50+5:302015-07-12T00:09:25+5:30
नेत्यांचे दौरे : निर्बंधांमुळे रहिवासी वैतागले; व्यावसायिकांना आर्थिक फटका

पोलिसांच्या तटबंदीने गोदाकाठ सुनसान
नाशिक : सकाळी विद्युत विभागाचे काम, तर दुपारी राज ठाकरे यांचा दौरा, सायंकाळी पालकमंत्र्यांची पाहणी अशी विविध कारणे दाखवून शनिवारी पोलिसांनी गोदाकाठच्या परिसराची लोखंडी बॅरिकेटिंगने तटबंदी केल्याने येथील रहिवाशांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले, तर व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून केल्या जात असलेल्या या ‘आड’मुठेपणामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येत्या १४ रोजी पुरोहित संघाचे ध्वजारोहण होणार असून, तत्पूर्वी सोमवार दि. १३ रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी रामकुंड व परिसरात राहणाऱ्या रहिवाशांकडूनही तयारी केली जात असताना शनिवारी पहाटेच पोलिसांनी कपालेश्वर मंदिराकडून गोयंका धर्मशाळेकडे जाणारा मार्ग विद्युत विभागाच्या कामामुळे बंद करून टाकल्याने सकाळी झोपेतून उठलेल्या नागरिकांना घरातच जेरबंद झाल्याचा अनुभव आला. मात्र त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण गोदाकाठे भोवतीच बॅरिकेटिंगचा फास आवळण्यास सुरुवात केली. मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंडाकडे येणारा रस्ता मालेगाव स्टॅण्डच्या कोपऱ्याला अडविण्यात आला, तर खाली कपालेश्वर मंदिराच्या पुढे गणपती मंदिर, साईबाबा मंदिर, सरदार चौक हा मुख्य रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मालवीय चौक, देवी मंदिराचा परिसरालाही वेढा घालण्यात आल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले. याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या परिसराला भेट दिली, तर त्यानंतर दुपारी चार वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही रामकुंड परिसराची पाहणी सुरू केल्याने पोलिसांच्या काठ्या व शिट्ट्यांचा आवाज आणखीनच वाढला. त्यामुळे गोदाकाठी आलेल्या वा येऊ पाहणाऱ्या नागरिकांना अक्षरश: पिटाळून लावण्यात आले.
शनिवारी शासकीय सुटी व कंपन्यांनाही सुटी असल्याने सिंहस्थ कुंभेळ्याच्या कुतूहलापोटी शहराच्या विविध भागांतील आलेल्या नागरिकांनाही पोलिसांच्या या तटबंदीचा फटका बसल्याने त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागले.