कुंभमेळ्याआधीच हवी गोदावरी प्र्रदूषणमुक्ती

By Admin | Updated: July 24, 2014 01:03 IST2014-07-23T23:18:18+5:302014-07-24T01:03:26+5:30

सतीश शुक्ल : साधू-महंतांच्या सूचनांचा विचार नाही, अधिकारीच करताहेत मनमानी कामे

Before Goddess Kumbh Mela, Godavari freedoms were released | कुंभमेळ्याआधीच हवी गोदावरी प्र्रदूषणमुक्ती

कुंभमेळ्याआधीच हवी गोदावरी प्र्रदूषणमुक्ती

नाशिक : दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदीकाठी भरणारा कुंभमेळा हा मोठा उत्सव आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीची कामे संथ चालू आहेत. त्यात समन्वयाचा अभाव आहे, तो दूर केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे कुंभमेळ्यानिमित्त ज्या गोदावरीत स्नान करायचे आहे, त्या गोदावरीचे प्रदूषण तरी पर्वणी स्नानापूर्वी थांबेल काय? असा प्रश्न नाशिक येथील श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी उपस्थित केला आहे. साधू-महंतच नव्हे, तर भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्याने कुंभमेळ्यापूर्वीच प्रदूषणाचा मुद्दा निकाली काढावा, असे आवाहनच शुक्ल यांनी केले.
कुंभमेळा हा विश्वसोहळा आहे. देश-विदेशातून भाविक या सोहळ्याला येत असतात. त्यांचा विचार करून कुंभमेळ्याचे नियोजन व्हायला हवे. देशात नाशिकसह चार ठिकाणी कुंभमेळा होतो. परंतु नाशिकला जितक्या संथ गतीने कामे होतात तशी कामे होत नाहीत. उज्जैन येथे २०१६ मध्ये कुंभमेळा होणार आहे. परंतु त्यासाठी तयारी मात्र चार ते पाच वर्षे अगोदरच सुरू झाली आहे. तेथे भाजपाचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी नर्मदेचे पाणी उज्जैनी नदीत टाकले आहे. पर्वणीचे स्रान ज्या नदी घाटांवर होणार आहे, त्या सर्व ठिकाणी म्हणजेच घाटांकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांचे रूंदीकरण पूर्ण झाले आहेत. मध्य प्रदेश सरकार आणि तेथील यंत्रणेचे इतके वेगाने सुरू असलेले काम बघितले की, आपण कोठे आहोत? असा प्रश्न निर्माण होतो. कुंभमेळ्याचा तयारीचा विचार केला, तर अधिकाऱ्यांची पोपटपंची सुरू आहे. कागदोपत्री दावे- प्रतिदावे सुरू आहेत. ही कामे झाली आहेत, ती कामे होणार आहेत. प्रत्यक्षात कोणती कामे पूर्ण झाली याचाच आढावा घेण्याची गरज आहे, असेही शुक्ल म्हणाले.
गेल्या चार कुंभमेळ्यांपासून मी सिंहस्थाच्या नियोजनात सक्रिय सहभाग दिला आहे. त्यामुळे मला कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या कामांचा चांगला अनुभव आहे. प्रशासन, साधू- महंत आणि पुरोहित संघ यांनी हातात हात घालून कुंभमेळ्यात कामे करणे अपेक्षित आहे; परंतु त्याचा यंदाच्या कुंभमेळ्यात अभाव दिसून आला. कुंभमेळा ज्यांच्या उपस्थितीमुळे होतो त्या साधू-महंतांच्या निवास आणि मूलभूत सेवांचा प्रश्न प्रलंबित आहे. साधुग्रामसाठी अद्याप जागा ताब्यात मिळालेल्या नाहीत. साधू-महंतांच्या मिरवणुकीचे मार्गही रुंद झालेले नाहीत. प्रशासनाच्या वतीने घाट बांधण्याची कामे सुरू आहेत, परंतु स्रान एका ठिकाणी, तर घाट भलत्या ठिकाणी अशी अवस्था आहे. नाशिक आणि पंचवटी अमरधामजवळ घाट बांधला जात आहे. वास्तविक, अशा ठिकाणी पवित्र स्नान होऊ शकत नाही. साधू-महंतांनी अमरधाम जवळून जाणारा नवीन शाही मार्ग नाकारला. असे असताना त्याच जागी घाट बांधणीचे काम सुरू आहे. स्मशानभूमीजवळ भाविकांना स्रान करायला लावणे ही फसवणूकच नाही काय, असा प्रश्न शुक्ल यांनी उपस्थित केला.
कुंभमेळ्याच्या केंद्रस्थानी गोदावरी नदीचे प्रदूषण निर्मूलन असले पाहिजे. त्यासाठी अगोदरच प्रयत्न व्हायला हवे होते, परंतु झालेले नाहीत. नदीपात्रात अनेक ठिकाणी नाले सोडण्यात आले आहेत. त्यामुळे अशा नदीपात्रात साधू-महंतांनी स्नान करावे काय, याचा विचार केला पाहिजे. कुंभमेळा सुरू होण्याच्या आतच गोदापात्र प्रदूषणरहित केले पाहिजे. रामकुंड हे सर्वार्थाने महत्त्वाचे आहे; परंतु त्याकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रामकुंडात निर्मळ पाणी असायला हवे. परंतु तसे होत नाही. किमान कुंभमेळ्याच्या वर्षात तरी रामकुंडात पाण्याची पातळी कायम ठेवली पाहिजे. त्यावर भर देण्याचे नियोजन आता तरी दिसत नाही. गेल्या कुंभमेळ्यात पालिकेने रामकुंड आणि परिसरातील कुंडे एकत्र केली आणि त्याचवेळी रामकुंडाचा तळ कॉँक्रिटीकरण करण्याचा अजब
प्रकार केला. त्यामुळे रामकुंड परिसरात जे नैसर्गिक झरे होते, ते बंद
झाल्याने निर्मळ पाणी येणेच बंद झाले आहे.
पेशवेकालीन घाटावर वर्षानुवर्षे गाळ साचलेला असून, तो हटविला पाहिजे. रामकुंड पालिकेच्या वतीने स्वच्छ केले जाते. परंतु त्यात सातत्य हवे. रामकुंडाचा परिसर अस्वच्छ असतो. तेथेही सातत्याने स्वच्छता करायला हवी, असे सांगून शुक्ल म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या तेव्हा पुरोहित संघाने अनेक सूचना केल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून यंत्रणा त्यांना सोयीची वाटेल अशीच कामे करीत आहेत, असेही ते म्हणाले.
कुंभमेळा तोंडावर आल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेला २३०० कोटी रुपयांचा आराखडा मार्गी लागला पाहिजे. साधू-महंत, पुरोहित संघ आणि खासगी संस्था व अन्य संबंधितांची समिती गठित केली पाहिजे. या समितीच्या वारंवार बैठका झाल्या पााहिजेत, तरच ही कामे आवाक्यात येऊ शकतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Before Goddess Kumbh Mela, Godavari freedoms were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.