ब्रह्मनादात दिमाखात फडकली धर्मध्वजा
By Admin | Updated: July 14, 2016 00:55 IST2016-07-14T00:55:05+5:302016-07-14T00:55:59+5:30
बरोबर एक वर्षापूर्वी....

ब्रह्मनादात दिमाखात फडकली धर्मध्वजा
नाशिक : प्रभातसमयी ६ वाजून १६ मिनिटांनी सिंह राशीत गुरू आणि रवि प्रवेशकर्ते झाले आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात तसेच नाशकातील गोदातटी उभारण्यात आलेल्या ४० फुटी ध्वजस्तंभावर सदाचार, सत्प्रवृत्ती, सद्वर्तन आणि त्याग-शौर्याची प्रतीक असलेली केशरी धर्मध्वजा ढोल-नगारे, शंखध्वनीच्या ब्रह्मनादात दिमाखात फडकली. धर्मध्वजा स्थापित होत असतानाच श्रीरामनाम आणि बम बम भोलेचा जयघोष करत सिंहस्थ कुंभपर्वाचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले आणि हजारो श्रद्धाळूंच्या साक्षीने बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वास प्रारंभ करण्यात आला.
बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच १४ जुलै २०१५ रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पुरोहित संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह तर नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख हजेरी लावली. बारा वर्षांनी येणारा हा मंगलमय सोहळा आठवणीत साठवून ठेवण्यासाठी नाशिककरांची पावले भल्या पहाटेच गोदाकाठाकडे वळाली होती. सिंहस्थ पर्वास सुरुवात होणार असल्याने संपूर्ण गोदाघाट यानिमित्ताने सुशोभीत करण्यात आला. या मुहूर्तावर केवळ सिंहस्थात वर्षभरासाठी उघडले जाणारे गोदावरी मंदिर ध्वजारोहणाबरोबरच उघडण्यात आले. ग्यानदास महाराज यांच्या हस्ते मंत्रोच्चारात या मंदिराचे पूजन करण्यात आले. रामकुंडाच्या उत्तरेस हे मंदिर असून, फक्त १२ वर्षांनी, म्हणजेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळीच एक वर्षभर हे मंदिर उघडते. वर्षातून दोनदा ज्येष्ठ शु. १० (गोदावरी जन्मदिवस) व कार्तिक शु. १५ त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सवासाठी हे मंदिर उघडले जाते. या मंदिरात भगीरथीची मूर्ती आहे. सिंहस्थ गोदावरीचे मंदिर फक्त नाशिकक्षेत्रीच आहे. मंदिर उघडल्यानंतर गोदावरी मातेच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.
ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला आदल्या दिवशी सायंकाळी नाशिक पुरोहित संघाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगल कलशाची पंचवटीतून भव्य मिरवणूक काढली. पहिल्यांदाच काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत अनेक धार्मिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ढोलताशांचा गजर, डीजेची धूम, फटाक्याच्या आतषबाजीत निघालेल्या या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रामकुंडावर या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.