ब्रह्मनादात दिमाखात फडकली धर्मध्वजा
By Admin | Updated: July 15, 2015 01:27 IST2015-07-15T01:26:58+5:302015-07-15T01:27:24+5:30
ब्रह्मनादात दिमाखात फडकली धर्मध्वजा

ब्रह्मनादात दिमाखात फडकली धर्मध्वजा
नाशिक : प्रभातसमयी ६ वाजून १६ मिनिटांनी सिंह राशीत गुरू आणि रवि प्रवेशकर्ते झाले आणि गोदातटी उभारण्यात आलेल्या ४० फुटी ध्वजस्तंभावर सदाचार, सत्प्रवृत्ती, सद्वर्तन आणि त्याग-शौर्याची प्रतीक असलेली केशरी धर्मध्वजा ढोल-नगारे, शंखध्वनीच्या ब्रह्मनादात दिमाखात फडकली. धर्मध्वजा स्थापित होत असतानाच श्रीरामनाम आणि श्रीपवनसुत हनुमानाचा जयघोष करत सिंहस्थ कुंभपर्वाचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले आणि हजारो श्रद्धाळूंच्या गर्दीने काठोकाठ भरलेला गोदाघाट या आनंदसोहळ्यात भाव-भक्तीरसाने न्हाऊन निघाला. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने गोदावरीतील रामतीर्थावर आयोजित मंगलमय सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधिवत आरोहण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्'ाचे पालकमंत्री व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह जगद्गुरू हंसदेवाचार्य, नाणीज पीठाचे जगद्गुरू नरेंद्राचार्य, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, दिगंबर आखाड्याचे श्रीमहंत रामकृष्णदास महाराज, रामकिशोरदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत धरमदास महाराज, महंत भगवानदास महाराज, निर्मोही आखाड्याचे श्रीमहंत राजेंद्रदास महाराज, अयोध्यादास महाराज, महंत भक्तिचरणदास, वारकरी संप्रदायाचे श्रीमहंत रामकृष्णदास लहवितकर, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे, माजी आमदार वसंत गिते, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदि उपस्थित होते. तत्पूर्वी, पालकमंत्री गिरीश महाजन आणि साधना महाजन तसेच खासदार हेमंत गोडसे व सौ. गोडसे यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. पहाटे साडेचार वाजेपासूनच धार्मिक विधीला प्रारंभ करण्यात आला. धर्मध्वजारोहणाचा हा आनंददायी सोहळा आपल्या काळजात साठविण्यासाठी श्रद्धाळू भाविकांनी गोदाघाटावर हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. इन्फो पुण्याहवाचनाने कार्यारंभ धर्मध्वजारोहणापूर्वी ब्रह्मवृंदाच्या पुण्याहवाचनाने सिंहस्थ कुंभपर्वाच्या शुभकार्यास प्रारंभ झाला. यावेळी गणेशपूजन, ध्वजपूजन, गंगापूजन, वरुणपूजन, बृहस्पतीपूजन तसेच शांतिसूक्तपठण आदि धार्मिक विधी करण्यात येऊन या वैश्विक सोहळ्यानिमित्त तमाम भाविकांसाठी पुण्यप्राप्तीचा संकल्प करण्यात आला. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, भालचंद्रशास्त्री शौचे, चंद्रशेखर पंचाक्षरी, शेखर शुक्ल, दत्तात्रेय भानोसे, दिनेश गायधनी, अमित पंचभय्ये, अतुल पंचभय्ये, गौरव पंचभय्ये, नितीन पाराशरे, अतुल गायधनी, योगेश वारे, नीलेश दीक्षित या ब्रह्मवृंदांनी धार्मिक विधीचे पौरोहित्य केले. इन्फो सोहळ्यावर हवाई पुष्पवृष्टी धर्मध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच या आनंदसोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. धर्मध्वजारोहणाप्रसंगी अवकाशात घिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि सिंहस्थ कुंभपर्वाच्या शुभारंभाला पहिल्यांदाच हवाई पुष्पवृष्टी होण्याचा प्रसंग भाविकांना अनुभवता आला. धर्मध्वजस्तंभावर हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीसाठी काही क्षण स्थिरावले त्यावेळी हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे निर्माण झालेल्या वाऱ्याच्या झोताने ध्वजस्तंभाजवळील पाहुण्यांची स्वत:ला सांभाळताना धावपळ उडाली. त्यातच रामकुंडातील पाण्यात उमटलेले तरंगही भाविकांसाठी आकर्षण ठरले. इन्फो असा आहे धर्मध्वज! पुरोहित संघाच्या वतीने रामकुंडालगत गोदावरी मंदिराजवळ ४० फुटी पाचशे किलो पितळी धातूपासून बनविण्यात आलेला ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभावर फडविण्यात आलेला धर्मध्वज केशरी रंगात असून, त्यावर एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला अमृतकलश आणि ॐ आणि श्री हे शुभचिन्ह आहे. १५ बाय ४.५ फूट असलेला हा धर्मध्वज नाशिकचे दुर्गेश खैरनार यांनी तयार केला आहे. सदर धर्मध्वज आता सिंहस्थकाल समाप्तीपर्यंत ११ आॅगस्ट २०१६ पर्यंत अखंडपणे फडकत राहणार आहे.